पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलँड (नॉर्डिक देश) या देशांच्या पंतप्रधानांची भेट घेत द्वीपक्षीय चर्चा केली. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे दुसरी भारत- नॉर्डिक परिषद झाली. या परिषदेसाठी आलेल्या नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलँड या देशांच्या प्रमुखांची नरेंद्र मोदींनी स्वतंत्रपणे भेट घेत चर्चा केली.
प्रथम पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोर यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. या दोघांमध्ये सागरी व्यापार, हरित ऊर्जा, अवकाश, आरोग्य आणि इतर काही क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली.
त्यानंतर नरेंद्र मोदींनी स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डेलेना अँडरसन यांची भेट घेतली. भारत आणि स्वीडनने संयुक्तपणे जाहीर केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा यावेळी आढावा घेण्यात आला. संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, कौशल्य विकास, अवकाश, शाश्वत ऊर्जा, स्मार्ट सिटी, विज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी २०१८ मध्ये हा कृती आराखडा जाहीर करण्यात आला होता.
हे ही वाचा:
अजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा
फडणवीस हिमतीचे राऊत आमचे गमतीचे
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी निसटले
त्यानंतर मोदींनी फिनलँडच्या पंतप्रधान साना मरीन यांचीही भेट घेत डिजीटल भागीदारी, गुंतवणूक, व्यापार यावर चर्चा केली. याशिवाय कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, मोबाईल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली.
नरेंद्र मोदींनी त्यानंतर आईसलँडच्या पंतप्रधान केट्रिन याकोबस्दोत्तिर यांच्याशी चर्चा केली. भूऔष्णिक ऊर्जा, सागरी अर्थव्यवस्था, पर्यावरणानुकूल व पुनर्वापर करण्याजोगी ऊर्जा, मत्स्यव्यवसाय, अन्नप्रक्रिया, डिजिटल विद्यापीठांसह शिक्षण व सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.