पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला

पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, २ मे रोजी पहाटे युरोप दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. नरेंद्र मोदी हे तीन दिवस युरोप दौरा करणार आहेत. यंदाच्या वर्षीचा नरेंद्र मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्लासगो येथील हवामान परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली होती. या दौऱ्यात ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत.

नरेंद्र मोदी हे ६५ तास या देशांमध्ये असणार आहेत. या काळात ते तब्बल २५ बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीहून जर्मनीला रवाना झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने (PMO) देताना एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनला गेले, तिथे ते भारत- जर्मनीचे संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.”

हे ही वाचा:

“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”

४ तारखेपासून ऐकणर नाही…भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा

जमलंच तर तुटून पडाना, भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर

एप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

पंतप्रधान सोमवारी बर्लिन, जर्मनी येथे पोहोचतील. त्यानंतर ते जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासोबत सहाव्या भारत- जर्मनी चर्चेत (IGC) सहभागी होतील. त्यानंतर मंगळवारी नरेंद्र मोदी डेन्मार्कला जाणार आहेत आणि नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी तिसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये जाऊन फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील आणि मायदेशी परततील. सध्या सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धादरम्यान नरेंद्र मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version