दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरणारा ओमिक्रोन व्हेरियंट आता देशभरात फोफावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २३ डिसेंबर रोजी कोरोना परिस्थिती आणि ओमिक्रोनचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी विषाणूचा नवीन प्रकार लक्षात घेता आपण सतर्क आणि सावधान रहायला हवे, असे निर्देश दिले. महामारी विरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही त्यामुळे कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
ओमिक्रोनमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्हा स्तरापासून सुरुवात करून राज्यांमधील आरोग्य यंत्रणा बळकट असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच ऑक्सिजन पुरवठा उपकरणांची उपलब्धता आणि ती पूर्णपणे कार्यरत आहेत याची राज्यांनी खात्री करून घेणे महत्त्वाचे असल्याचे मोदींनी बैठकीत सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’
लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट
पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!
उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप
ओमिक्रोनमुळे नव्याने निर्माण होणाऱ्या हॉटस्पॉट्सवर प्रभावी देखरेख करावी, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह नमुने तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच केंद्र सरकारने वाढती रुग्णसंख्या, अपुऱ्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि कमी लसीकरण असलेल्या राज्यांमध्ये मदत करण्यासाठी पथके पाठवावीत असेही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना रुग्ण, ओमिक्रोन बाधित, लसीकरण आदी सर्व बाबींचा आढावा घेतला.
ओमिक्रोन विरुद्ध लढण्यासाठी केंद्राकडून देण्यात आलेली पंचसुत्री
- मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाबतीत कठोर नियमावली सुनिश्चित करा. रात्री संचारबंदी लावण्यात यावी. विशेषत: आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम सुनिश्चित करा. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नवीन ठिकाणांबाबतीत कंटेमेंटन झोन, बफर झोन यांची यादी तयार करा. पॉझिटिव्ह नमुने त्वरित जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठवा.
- लसीकरण न झालेल्यांना तात्काळ पहिला डोस देण्याला प्राधान्य द्या. तसेच ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांचेही लसीकरण तात्काळ करा. १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा. घरोघरी लसीकरण मोहिमेवर लक्ष द्यावे.
- बेड्सची संख्या वाढवावी, रुग्णवाहिका सेवेवर लक्ष द्यावे, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरळीत आणि गरज भासल्यास वापरात असण्याची खात्री करावी. किमान ३० दिवसांचा औषधांचा साठा राखीव ठेवावा.
- सर्व राज्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये डेल्टा आणि ओमिक्रोन रुग्णसंख्येवर बारीक लक्ष ठेवावे. तसेच दर दिवशी आणि प्रत्येक आठवड्याला रुग्ण पॉझिटीव्हीटी, दुपटीचा दर आणि नव्याने जास्त रुग्ण वाढणारी ठिकाणे या भागात कठोर नियमावली लागू करण्यात यावी, असे सांगण्यात आले.
- लोकांमध्ये चुकीची माहिती पसरणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिकांना वारंवार सूचना आणि योग्य माहिती पुरवण्यासाठी तत्पर राहा, जेणेकरून भीती किंवा चुकीची माहिती पसरणार नाही.