पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगालमध्ये पुरूलिया येथे सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ले चढवले आहेत. या सभेत मोदींनी तृणमुल काँग्रेसच्या सरकारने गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसा या व्यतिरिक्त काय दिले आहे? असा सवाल देखील केला. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत भाजपा सत्तेत आल्यावर कायद्याचे राज्य प्रस्थापित करेल असा आश्वासन देखील मोदींनी बंगालच्या जनतेला दिले.
यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी यांच्या घोषवाक्याला आव्हान दिले. ते म्हणाले “दीदी बोले खेला होबे, बीजेपी बोले चाक्री होबे, दीदी बोले खेला होबे, बीजेपी बोले विकास होबे, दीदी बोले खेला होबे बीजेपी, बोले शिक्षा होबे, खेला शेश होबे, विकास आरंभ होबे.”
या सभेत बोलताना मोदी म्हणाले “दीदीने बंगालला काय दिले? इथे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, पण तुरूंगात नाहीत. घुसखोर, माफिया मुक्तपणे फिरत आहेत. इथे घोटाळे होत आहेत, परंतु कारवाई होत नाही. कालच २४ उत्तर परगणा येथे बॉम्बस्फोट झाला. भाजपा कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. हिंसाचार, अनागोंदी, माफिया राज यापुढे सहन केले जाणार नाही. मी बंगालच्या लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की भाजपा सत्तेत आल्यानंतर प्रत्येक गुन्हेगाराला अटक करण्यात येईल. भाजपा कायद्याचे राज्य आणेल.”
हे ही वाचा:
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक
लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी
सचिन वाझेंनी वापरलेला सदरा एनआयएच्या ताब्यात
ममता बॅनर्जी या आपल्यावर राग काढत असल्याचे देखील ते म्हणाले. मोदी म्हणाले, “बंगाली जनतेने केव्हाच निश्चय केला आहे. ‘लोकसभा में टीएमसी हाफ और इस बार पुरी साफ’ ही घोषणाच बरेच काही सांगत आहे. हा निश्चय पाहून दीदी घाबरल्या आहेत. परंतु भारतातील इतर कोणत्याही मुली प्रमाणे त्याही भारतमातेची मुलगी आहेत. त्यांचा आदर करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळेच त्यांच्या दुखापतीबद्दल आम्हाला काळजी वाटते. मी देवाकडे प्रार्थना करतो, त्यांची दुखापत लवकरात लवकर बरी व्हावी.” यावेळी त्यांनी टीएमसीची नवी व्याख्या पण सांगितली. ते म्हणाले, “केंद्राच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पॉलिसीच्या विरुद्ध बंगालची ट्रान्सफर माय कमिशन (टीएमसी) पॉलिसी आहे.” दीदींना जनधन खात्यांची भिती वाटत आहे कारण, जनधन खाती हा तुमचा अधिकार आहे.
“पश्चिम बंगालचा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्व घटक एकत्र येतील, परंतु ममता दीदींनी दलित, आदिवासी, एससी/एसटी इत्यादींना कधीच एकत्र आणले नाही. गेल्या १० वर्षातील भ्रष्टाचारी कारभारामुळे या लोकांचे फार नुकसान झाले आहे.” असे मोदींनी सांगितले. “अटलजींनी दलित आणि आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले. आम्ही आदिवासींसाठी अनेक योजना आणल्या.” असे मोदींनी सांगून उज्ज्वला योजनेत किती मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा झाला हे देखील लोकांना सांगितले.
या सभेत मोदींनी शोनार बांग्ला बनवण्यावर भर दिला. ते म्हणाले की, “आम्हाला गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातल्या शोनार बांग्लाची निर्मीती करायची आहे. जिथे बंगालचा अभिमान आणि ताकद एकत्र नांदेल, जिथे प्रत्येक गरीबाला, आदिवासीला, शेतकऱ्यांना सन्माननिय आयुष्य जगता येईल, जिथे प्रत्येक माता भगिनीला सुरक्षितपणे वावरता येईल, जिथे प्रत्येक तरूणाला रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील, जिथे उद्योगांची कमतरता नसेल, जिथे भ्रष्टाचाराला थारा नसेल आणि जिथे गुन्हेगार तुरूंगात असतील रस्त्यावर नाही.” “प्रत्येक बंगाली माणसाने लक्षात ठेवावे की आता तुमच्या मातृभूमीसाठी काही करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता बंगालला दमनकारी आणि दडपशाहीवादी राजवटीपासून मुक्त करण्याची वेळ झाली आहे.”
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्पात निवडणुका होणार आहेत. दिनांक २७ मार्चपासून निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार आहे तर मतदानाचा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.