अवघा देश नेताजींसमोर नतमस्तक

अवघा देश नेताजींसमोर नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोलकाता दौऱ्याची सुरूवात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्तवपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांना आदरांजली वाहून केली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारत नेताजींना अभिवादन करतो असे म्हटले आहे.

“त्यांचे शौर्य आणि त्यांची कर्तृत्व प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे. भारत नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन करतो.” पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्वीट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता दौऱ्याला शनिवार २३ जानेवारी रोजी दुपारपासून प्रारंभ झाला. यंदा नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी ३ च्या सुमारास ‘नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शहराच्या दिशेने रवाना झाले.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५व्या जयंती निमित्त हा दिवस यापुढे देशभरात पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

पश्चिम बंगाल राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. ह्या निवडणूकीसाठी भाजपा आक्रमक प्रचार करत आहे. त्यामुळे विविध नेत्यांनी यापूर्वी बंगालचा दौरा केला आहे, ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचादेखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

Exit mobile version