भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटलीमध्ये दाखल झाले आहेत. जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोमला आले आहेत. यावेळी नेहमी प्रमाणेच इटलीतील भारतीय लोकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या येण्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी, त्यांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी भारतीय लोक गर्दी करताना दिसत आहेत. तर यावेळी पंतप्रधान मोदींसमोर खास शिवतांडव स्तोत्र सादर करण्यात आले.
या आपल्या भेटीत अनेक भारतीयांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. याचे अनेक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले. इटलीमध्ये राहणाऱ्या माही गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शिव तांडव स्तोत्र प्रस्तुत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः खूप मोठे शिवभक्त आहेत. हे संपूर्ण स्तोत्र सुरु असताना ते हात जोडून शिवभक्तीत लीन झालेले दिसले. हे स्तोत्र संपताच ‘भारत माता की जय’ चा जयघोष झाला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून यात नरेंद्र मोदी एका नागपूरच्या व्यक्तीशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहेत. हे व्यक्ती म्हणजेच माही गुरुजी.
हे ही वाचा:
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
“मी नागपूरचा आहे?” असे सांगताच पंतप्रधान मोदी त्यांना “नाव काय तुमचं?” असे मराठीतून विचारतात. माही गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती गेल्या २० वर्षांपासून इटलीमध्ये आहे. तिथल्या नागरिकांना ते योग आणि संस्कृत शिकवतात. पंतप्रधान मोदींनी त्यांची अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि ती देखील आपल्या मायमराठीतून.
मोदी जी, मी नागपूर
“Modi ji, Me Nagpur” says a person in Rome to the Indian Prime Minister & both converse in #Marathi
Wow, what a moment !@narendramodi @PMOIndia #ModiInRome #नागपूर #Nagpur pic.twitter.com/Ie3G5Uzrre— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 29, 2021
दरम्यान पंतप्रधान मोदींनी इटलीच्या विद्यापीठांमधील अनेक विचारवंत आणि संस्कृत तज्ञांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी भारतीय संस्कृती, साहित्य आणि योगाभ्यास आणि आयुर्वेदाच्या पद्धतींमधील त्यांची रुची जाणून घेतली आणि भारत आणि इटली यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.