चौरीचौराच्या शताब्दी बद्दल पोस्टाचे स्टँपद्वारे अभिवादन

चौरीचौराच्या शताब्दी बद्दल पोस्टाचे स्टँपद्वारे अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील, चौरीचौरा येथील घटनेच्या शताब्दी निमित्त  काढण्यात आलेल्या पोस्टाच्या स्टँपचे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी चौरीचौरा येथे घडलेल्या १९२० सालच्या घटनेबद्दल सांगितले. “चौरीचौरा येथील पोलिस ठाण्याला लावण्यात आलेली आग ही सामान्य घटना नाही. या घटनेतून देण्यात आलेला संदेश स्पष्ट होता. अनेक कारणांमुळे या प्रसंगाला फार महत्त्व देण्यात आले नाही, मात्र आपण ही घटना कोणत्या पार्श्वभूमीवर घडली ते तपासून पाहणे आवश्यक आहे. आग पोलिस ठाण्याला नाही, तर लोकांच्या हृदयात लागली होती.”

“चौरीचौराच्या घटनेत हुतात्मा झालेल्यांबाबत फारसे बोलले जात नाही हे दुर्दैवी आहे. जरी इतिहासाच्या पुस्तकाच्या पानांवर त्यांना फार किंमत देण्यात आली नसली तरीही त्यांच्यापासून हा देश कायमच प्रेरणा घेत राहील.” असे मोदी यांनी सांगितले.

या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. चौरीचौरा घटनेची शताब्दी साजरी करण्याच्या राज्य सरकारच्या विविध कार्यक्रमांना सकाळपासून सुरूवात झाली. हे कार्यक्रम राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांत साजरे केले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत

याच प्रसंगी बोलताना मोदींनी, मागील सहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी सरकारने विविध पावले उचलली असल्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांचे देशाच्या प्रगतीतील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा देखील उल्लेख केला.

शेतकऱ्यांसाठी एक हजार नव्या मंडी स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांना सरकारच्या इ-नामसोबत जोडण्यात आले आहे. त्यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version