भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील कारकिर्दीला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत. ७ ऑक्टोबर २००१ रोजी मोदींनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी नावाचा झंझावात सुरूच आहे. विशेष म्हणजे या वीस वर्षांच्या कारकिर्दीत मोदी एकदाही पराभूत झालेले नाहीत.
मोदींच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला, तर त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. हिंदुत्वाच्या विचारांनी झपाटून गेलेले मोदी सुरूवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामात ते सक्रिय झाले. २००१ साली संघटनेने निर्णय घेतला आणि मोदींकडे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. या संधीचे त्यांनी सोने केले. तेव्हापासून भारतीय राजकारणात मोदी नावाचे नवे पर्व सुरू झाले. गेल्या वीस वर्षात नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातला एक महत्त्वाचा बिंदू राहिले आहेत.
नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणाच्या दृष्टीने नवे आयाम स्थापन केले. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करता येऊ शकते आणि त्या मुद्द्यावर सातत्याने निवडूनही येता येते हे मोदींनी दाखवून दिले. मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी गुजरातचा चेहरामोहराच पालटून टाकला. नव्या युगाचा तंत्रज्ञानाशी जुळवून घेणाऱ्या आणि काळाची पावले ओळखणारा राजकारणी अशी मोदींची प्रतिमा आहे. नवे तंत्रज्ञान आणि नवी माध्यमे यांचा राजकारणाच्या दृष्टीने प्रभावीपणे वापर करण्यासाठी ते ओळखले जातात.
१२ वर्ष गुजरात मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय राजकारणाची नवी इनिंग सुरू झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीने मोदींना आपला पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केले आणि भाजपाने २८२ जागा जिंकत एक हाती बहुमत मिळवले. या ऐतिहासिक विजयासह नरेंद्र मोदी हे भारतातील पहिले असे राजकारणी ठरले जे विधानसभेत दाखल झाले ते मुख्यमंत्री म्हणून दाखल झाले आणि लोकसभेत दाखल झाले ते थेट पंतप्रधान म्हणूनच दाखल झाले.
हे ही वाचा:
मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
या सात वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरची भारताची प्रतिमा चांगलीच सुधारली. पाकिस्तान, चीन यांना भारत डोळ्यात डोळे घालून उत्तर देऊ लागला. अमेरिका, रशिया सारखे महासत्ता असणारे देशही भारताला तुल्यबळ समजू लागले. हे सगळे बदल घडले ते मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या धोरणामुळे. व्हॅक्सिन मैत्री या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत भारताने जगभरातील अनेक देशांना कोविड प्रतिबंधक लसी पाठवल्या आहेत.
वीस वर्षात मोदींवर अनेक आरोपही झाले. गोधरा हत्याकांडाचे खापर त्यांच्या माथी फोडून त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रयत्नही झाला. गोधराचा बागुलबुवा जाणीवपूर्वक मोठा केला गेला. मोदींची प्रतिमा डागाळण्यासाठी मोठे कारस्थान रचले गेले. पण मोदी डगमगले नाहीत. अग्निपरीक्षेतील सीतेप्रमाणे ताठ मानेने ते यातून बाहेर आले.
या वीस वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता, ‘देश नही झुकने दुंगा’ असे म्हणत मोदी सतत कार्यरत राहिले आहेत. आजही न थकता भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी ते अखंड कार्यमग्न आसतात. म्हणूनच ते आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय राजनेत्यांपैकी एक आहेत.