पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठ्या सभेला संबोधित केलं. राहुल गांधी यांनी राजपूत समाजावर केलेल्या टिप्पणीची आठवण करून देत पंतप्रधानांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.पंतप्रधान म्हणाले की, राहुल गांधी यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चेन्नमा यांचा अपमान केला आहे.मात्र, नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह यांच्या विरोधात बोलण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशभरात सुरु आहे.लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले असून आता उर्वरित पाच टप्प्यांचे मतदान पार पडणार आहे.त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची प्रचार सभा जोरदार सुरु आहे.आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याने नवा वाद सुरु झाला असून सत्ताधाऱ्यांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.पंतप्रधान मोदींनी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे.
कर्नाटकातील बेल्लारी येथे राहुल गांधी यांची सभा पार पडली होती.या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये राजा-महाराजांचा उल्लेख केला होता.महाराज गरीब लोकांची जमीन हडप करत होते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.भाजप नेते अमित मालवीय यांनी या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांनी तात्काळ राजपूत समाजाची माफी मागावी, असे म्हटले होते.
अमित मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की, राजे-महाराजांचे जेव्हा राज्य होते, तेव्हा ते वाटेल ते करायचे.कोणाची जमीन पाहिजे असेल तर ते काढून घेऊन जात असत.काँग्रेस पक्ष आणि आमच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या जनतेला मिळून स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकशाही आणली आणि देशाला संविधान मिळवून दिले, असे राहुल गांधी या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.
हे ही वाचा:
‘तो’ व्हिडीओ गुजरातमधील नसून इजिप्तचा !
‘परिस्थिती बदलली, आता तुम्ही भारतीय नसलात तर अमेरिकेत सीईओ होऊ शकत नाही’
पंजाबमध्ये मला ‘नमस्ते’ची ताकत समजली
२०१५पासून आम आदमी पार्टीने जाहिरातींवर केला १५०० कोटी रुपयांचा खर्च
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी जोरदार टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या राजपुत्राचे असे म्हणणे आहे की, भारताचे राजा-महाराजा अत्याचारी होते.हे गरिबांची जमीन लुबाडत असत.जेव्हा त्यांची मर्जी असेल तेव्हा गरिबांकडून सर्व हिसकावून घेत असत.काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज आणि कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा अपमान केला आहे.यांचे सुशासन आणि देशभक्ती आजही आम्हा सर्वांना प्रेरित करते.काँग्रेसच्या राजपुत्राचे हे वक्तव्य वोटबँकसाठी आणि तुष्टीकरणाच्या उद्देशासाठी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, भारताच्या इतिहासात जे अत्याचार नवाबांनी केले, निजामांनी केले, सुलतानांनी केले, बादशहांनी केले.याच्यावर मात्र काँग्रेसचा राजपुत्र काहीच बोलत नाही, त्याच्या तोंडावर टाळे लागले जाते, बोलती बंद होते आणि ‘राजे-महाराजेंना’ शिव्या देता, त्यांचा अपमान करता.काँग्रेसला औरंगजेबाच्या अत्याचाराची आठवण येत नाही, ज्याने आमची शेकडो मंदिरे तोडली, अपवित्र केले. औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या पक्षांसोबत काँग्रेस युती करते.आमच्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना ही लोकं आठवत नाहीत.भारताच्या विभाजनात मोठी भूमिका बजावणाऱ्या नवाबाची यांना आठवण येत नाही.काँग्रेसची सरकार जिकडे आली तिकडे विकासाचे पलायन सुरु होते.कर्नाटकमध्ये सुद्धा हेच होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.