रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा १२ वा दिवस असून आज युद्धाची तीव्रता कमी झालेली दिसत आहे. आज पंतप्रधान मोदींनी युद्धासंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. जवळपास पन्नास मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचा सल्ला मोदींनी पुतिन यांना दिला आहे.
पुतीन यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली होती. आज दुपारी पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोदी यांनी पुतिन यांना झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय पुतिन यांनी यावेळी सुमी शहरात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढून घेण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. मोदींनी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या निर्णयाचेही कौतुक केले आहे.
सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. अजूनही युक्रेनमध्ये सातशे भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. हे विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे असून, ते सुमी शहरात आहेत.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाचे काही अधिकार मिळणार राज्य सरकारला
आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा
रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपया घसरला!
अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही
दरम्यान, रशियाने चार शहरांमध्ये तूर्तास तरी युद्ध थांबल्याची घोषणा केली आहे. त्यात कीव , मारियूपोल, खारकीव आणि सुमीचा समावेश आहे. त्यामुळे सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे.