न्यूयॉर्कमधील एका शीख दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेत एका भारतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल गुप्ता असे या भारतीयाचे नाव असून एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या न्याय खात्याने मॅनहॅटन न्यायालयात ५२ वर्षीय निखील गुप्तावर आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्याच आठवड्यात ‘फायनान्शिअल टाइम्स’ने अमेरिकेच्या पोलिसांनी पन्नून याच्या हत्येचा कट उधळला असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर या हत्येचा कट रचण्यामागे भारताचा हात असल्याबाबत चिंता व्यक्त करून अमेरिकेने भारताला इशाराही दिला होता.
निखिल गुप्ता याने भारत सरकारचा कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या मदतीने न्यूयॉर्कचा रहिवासी असलेल्या शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येचा कट आखला होता, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. यातील खलिस्तानी फुटीरतावादी आणि कथित भारतीय अधिकाऱ्याचे नाव जाहीर केलेले नाही. गुप्ता याच्या विरोधात दोन आरोप ठेवण्यात आले असून तो सध्या झेक प्रजासत्ताक येथे अटकेत आहे. त्याचे अमेरिकेत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हे ही वाचा:
आरेतून प्रवास करायचा असेल तर भरावा लागेल ‘ग्रीन टोल’!
इस्रायल-हमास युद्धविरामत एक दिवसीय वाढ!
६१ व्या वर्षी डॉक्टरला कळाले की आपण अमेरिकेचे नागरिक नाही!
योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग
हा सरकारी अधिकारी स्वतः सुरक्षा व्यवस्थापनाचा आणि गुप्तचर विभागाचा ‘सीनिअर फील्ड ऑफिसर’ असल्याचे सांगत असे. या प्रकरणात गुप्ता दोषी ठरल्यास त्याला २० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यातील वकील मॅथ्यु जी ओल्सेन यांनी सांगितले. हत्येचा कट तडीस नेण्यासाठी गुप्ता याला एक लाख अमेरिकी डॉलर मिळणार होते. त्यातील १५ हजार अमेरिकी डॉलरची आगाऊ रक्कम ९ जून, २०२३ रोजी मिळाली होती, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही हत्या घडवून आणण्यासाठी त्याने ज्या मारेकऱ्याशी संपर्क साधला तो अमेरिकेच्या पोलिस विभागासाठी काम करत होता.
केंद्राची चौकशी समिती
पन्नूच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपांबाबत चौकशीसाठी भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बुधवारी दिली. १८ नोव्हेंबर रोजी सर्व संबंधित पैलूंचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.