मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंध लादले आहेत. त्याविरोधात राज्यभरात विविध व्यापारी संघटनांनी निदर्शने केली आहेत. एकूण या निर्णयाबाबत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे.
या पत्रात फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांना दिलासा देणारी काही पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्याबरोबरच संपूर्ण आठवडा टाळेबंदी सदृश नियमावली जारी केल्यामुळे अनेकांच्या होत असलेल्या नुकसानाकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत फडणवीसांनी ट्वीट देखील केले आहे. त्यात ट्वीटमध्ये हे पत्र जोडले आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
हे ही वाचा:
राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय?- अतुल भातखळकर
बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से
हे निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा अजिबातच विचार करण्यात आलेला नाही असेही त्यांनी ठाकरे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. या टाळेबंदीमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सर्व घटकांचा विचार करून छोट्या- छोट्या घटकांशी चर्चा करून सर्वसामान्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या भयावह गतीने वाढत आहे. कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यात वीकेंड लॉकडाऊनचा देखील समावेश आहे परंतु, इतर दिवशी मात्र केवळ काही उद्योगांनाच परवानगी देण्यात आल्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.