पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

पियुष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यसभेतील नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधी भाजपातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोयल यांच्या आधी थावरचंद गेहलोत हे भाजपाचे राज्यसभेतील नेते होते. तर पियुष गोयल हे उपनेते म्हणून कामकाज पाहत होते. पण गेल्याच आठवड्यात गेहलोत यांची कर्नाटक राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राज्यसभेतील भाजपाचे नेते पद रिक्त झाले होते. त्यामुळेच उपनेते असणारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर आता नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर

केंद्र सरकारने दिली खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ

काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…

भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी आ.राम सातपुते यांची नियुक्ती

पियुष गोयल हे २०१० सालापासून भाजपातर्फे राज्यसभेत निवडून जात आहेत. तर २०१४ सालापासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा एक भाग आहेत. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात पियुष गोयल यांच्यावर वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर या आधी त्यांनी वाणिज्य मंत्री, ग्राहक,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, तसेच रेल्वेमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत यशस्वीपणे कामकाज पाहिले आहे.

शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सनदी लेखापाल असणारे गोयल हे भाजपाचे एक अभ्यासू मंत्री म्हणून ओळखले जातात. भाजपा नेते अरुण जेटली यांच्या निधनानंतर राज्यसभेत भाजपा सरकारची बाजू मांडणाऱ्या काही महत्वाच्या नावांमध्ये गोयल यांच्या नावाचा समावेश होतो.

Exit mobile version