विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर व्यवहारांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाची कागदपत्र पत्रकारांसमोर मांडली आणि ६.३ जीबीचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय पत्रकार परिषद झाल्यावर हा डेटा घेऊन दिल्लीला केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या डेटामधून त्यांनी फोन टॅपिंग आणि त्यातून होणारा बदल्यांचा भ्रष्टाचार उघड होत असल्याचेही सांगितले.
पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे १७ फेब्रुवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आल्याचे सांगितले. तसेच त्याचा पोलिसांकडे रेकॉर्ड असल्याची माहितीही त्यांनी पुरवली. १५ फेब्रुवारीलाच अनिल देशमुख हे खाजगी विमानाने मुंबईला आल्याचेही ते म्हणाले, त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेली माहिती खोटी असल्याचंही सिद्ध होत आहे असे फडणवीस म्हणाले. पवारांना गृहमंत्री अनिल देशमुखांची पाठराखण करण्यासाठी चुकीची माहिती पुरवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांची लवकरच गृहमंत्री पदावरून हकालपट्टी?
पवार साहेब सांगतील ते ब्रह्मवाक्य
सचिन वाझेची ‘ती’ डायरी एनआयएच्या हाती
‘ए भाई, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’; अमृता फडणवीसांनी झापले
मुंबईमध्ये रश्मी शुक्ला या कमिश्नर ऑफ इंटेलिजन्स असताना त्यांनी पोलिसांच्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अहवालही ८ ऑगस्ट २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल गृहमंत्र्यांकडे पाठवला आणि यावर कोणतीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी सरकार वाचवण्यासाठी या प्रकारावर पांघरूण घातल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
अशा प्रकारे पोलीस गैरव्यवहार करत असल्याची माहिती फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना २०१७ साली सुद्धा सरकारकडे आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तात्काळ ऍक्शन घेतली होती, असेही त्यांनी सांगितले. फडणवीसांनी या सर्व प्रकरणाचा ६.३ जीबीचा डेटा एका पेन ड्राईव्हमधून आणला. हा सर्व डेटा दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.