पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी फरार

पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी फरार

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मुंब्रा शहर अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी यांनी परवानगीशिवाय सभा घेऊन लोकांना भडकवले होते. त्यामुळे त्यांच्यासह ३१ जणांवर काल, १५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलीस त्यांना ताब्यात घेण्यास गेले असता ते फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरासह कार्यालय आणि इतर ठिकाणी शोधमोहीम सुरु केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाणे उत्तर सभेत मशिदींवरील भोग्यांबाबत कठोर भूमिका घेतली होती. ३ एप्रिलपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर राज्यातील प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा ठाकरेंनी दिला होता. त्यावरून पीएफआयचे मुंब्रा अध्यक्ष यांनी नमाजानंतर मुस्लिम समुदायातील लोकांशी संवाद साधत त्यांना भडकवले. त्यांनी ठाणे ग्रामीण भागातील मुस्लिमबहुल भागात शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी ही सभा घेतली होती. मतीन यांनी, आम्हला छेडले तर आम्ही सोडणार नाही, अशी थेट धमकीच दिली होती.

अब्दुल मतीन यांनी नमाजानंतर लोकांशी संवाद साधण्यासाठी मुब्रा पोलिसांकडून परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून तरीही मतीन यांनी लोकांशी संवाद साधत त्यांना भडकावले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन

दिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी

मशिदीवरील भोग्यांसंबंधी मनसेला इशारा देणाऱ्या PFI नेत्यावर गुन्हा

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलखोल अभियान

विनापरवाना मतीन यांनी लोकांना जमवून भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यासह ३१ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर पोलीस जेव्हा त्यांना ताब्यात घेण्यास गेले तेव्हा मतीन फरार झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी, १६ एप्रिल रोजी मतीन हे मुंबईत होते त्यांनतर कुठे गेले आहेत याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असे सांगितले आहे. मतीन यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(३) आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version