राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांची २८ डिसेंबरला सुटका होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने त्या परिसरात बाईक रॅली काढण्याची तयारी केली होती पण त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश भोसले यांना पत्र पाठविले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, २८ डिसेंबर रोजी आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आर्थर रोड कारागृह ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढणार आहात. पण सदर बाईक रॅलीमध्ये अनेक लोक सहभागी होणार असल्यामुळे बाईक रॅलीच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता सन १९७३ च्या कलम १४९ नुसार आपणास नोटीस पाठविण्यात येत आहे की, बाईक रॅली काढू नये तसेच दखलपात्र व अदखलपात्र गुन्हा तसेच सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
जर असे कोणतेही कृत्य आपणाकडून झाले तर त्याबाबत कायदेशीर कारवाईस पात्र राहाल व त्यानुसार कारवाई केली जाईल. सदर नोटीस ही पुरावा म्हणून आपणाविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात येईल. अनिल देशमुख हे जवळपास वर्षभर तुरुंगात असून मनीलाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज केला होता पण न्यायालयाने तो फेटाळल्याने अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री होते. त्यांची सुटका होणार म्हटल्यानंतर आर्थर रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.