आझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…

आझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…

बेळगावात भाजपाच्या दणदणीत विजयामुळे शिवसेनेला पुन्हा मराठी अस्मिता आठवली आहे. ‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली तेव्हा महाराष्ट्रात काही लोकांनी पेढे वाटले होते. मराठी माणसाचा पराभव झाला त्याचा उत्सव कसला साजरा करताय?’, असा सवाल शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी या विजयानंतर केला आहे.

बेळगावात शिवसेना लढली नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठींबा दिला होता. त्यांच्यासाठी प्रचार केला होता. स्वत: संजय राऊत प्रचाराला गेले होते. पण एकीकरण समितीचा बाजार उठला. कारण शिवसेनेच्या तोंडून मराठी अस्मितेच्या बाता ऐकण्याची कोणाची इच्छा नाही. जनता हल्ली कामाकडे पाहून मतदान करते. बोलाची कढी आणि बोलाच्या भातावर पोट भरण्याचे दिवस आता उरले नाहीत.

मुंबई महानगर पालिकेत गेली २४ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मराठी माणसासाठी आवाज उठवणारा पक्ष अशी शिवसेनेने स्वत:ची प्रतिमा बनवली. परंतु गेल्या अडीच दशकांचा आलेख पाहिला तर शिवसेनेची पकड असलेल्या मुंबईत मराठी माणसांचा टक्का सातत्याने कमी होतोय. मराठी माणूस आता थेट विरार, बदलापूर, अंबरनाथपर्यंत फेकला गेला आहे.
मराठीचे नाव घेऊन शिवसेना सतत मुंबई, ठाणे महानगर पालिकेच्या सत्तेवर आली. परंतु मराठी माणसाला काय दिले? वडा पावच्या गाड्या, रस्त्यावरचे खड्डे, कचऱ्याने भरलेले नाले, पालिका शाळांतील भिकार कारभार,
मोकळ्या प्लॉटवर रातोरात उभ्या राहणाऱ्या झोपडपट्ट्या आणि हफ्तेखोरीसाठी अनधिकृत फेरीवाल्यांचा जाच.

मराठी अस्मितेच्या बाता करणाऱ्या शिवसेनेने मराठीतून घेतलेले शिक्षण हे पाप ठरवले. दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण झालेल्या १५० उमेदवारांना पालिकेत शिक्षकांची नोकरी नाकारण्यात आली. मातृभाषेतून शिक्षण हे जगभरात प्रगतीचा राजमार्ग मानला जात असताना महाराष्ट्रात मात्र मराठीतून शिकणे हे पाप झाले. मुंबई महानगर पालिकेत शिक्षकाच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावीपर्यंत मराठीत शिक्षण घेतल्याचा ठपका ठेवून नाकारण्यात आले. हा शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्याय होता. मराठीवर चालवलेल्या या वरवंट्याविरुद्ध फेब्रुवारी २०२१ पासून १५० तरुणांनी आझाद मैदानात उपोषण सुरू झाले. ते पुढे काही महिने चालले. महाराष्ट्राची मराठी अस्मिता आझाद मैदानात ५५ दिवस रडत होती. परंतु तिचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही. आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या त्या दीडशे तरुणांना दिलासा देण्यासाठी एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. त्यांना न्याय देण्यासाठी एकाही शिवसेना नेत्याने आवाज उठवला नाही. त्यांच्यासाठी ‘सामना’ने एकही अग्रलेख खरडला नाही. अलिकडे राहुल गांधी आणि नेहरुंसाठी वारंवार गळा काढणारे ‘सामना’चे कार्यकारी मराठी माणसाच्या हक्कासाठी क्वचितच आवाज उठवतात.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी सोयरीक करून शिवसेना सत्तेवर आल्याला आता सुमारे दोन वर्षांचा काळ झालेला आहे. या काळात मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेनेने काय पावले उचलली? मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्र सरकारचा डाव, हे शिवसेनेचे जुने पालुपद. अनेक वर्षे लोकांनी हे पालुपद सहन करत शिवसेनेला डोक्यावर घेतले. परंतु संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या, मुंबईचे अस्तित्व स्वतंत्र ठेऊ पाहणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर गोळ्या झाडणाऱ्या, १०६ आंदोलकांची हत्या करण्याचे पाप शिरावर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या मांडीवर बसून शिवसेना आज मराठी अस्मितेच्या बाता करते आहे. त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या बाता म्हणजे निव्वळ वाफा असल्याचे लोकांना पुरते कळून चुकले आहे. ही मराठी अस्मिता फक्त शिवसेना नेतृत्वाच्या तुंबड्या भरण्यासाठीच आहे हे लोकांना समजले आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

‘सेलमोन भोई’वर कोर्टाने आणली बंदी

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे होते एकूण १३ जण

परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला का दिले ५ लाख रुपये?

आपल्या भूलथापा मराठी जनांच्याही लक्षात आल्या आहेत, याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाला खात्री झाल्यामुळे मतांसाठी आता इथे-तिथे चाचपणी करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहे. आदित्य ठाकरे वरळीत लढले तेव्हा शिवसेनेने ‘केम छो वरळी…’ ची हाळी दिली, ती मराठी मतांबाबत साशंक असल्यामुळेच.

मराठी अस्मितेचे नाव घेणाऱ्यांनी मुंबईकर कोळी बांधवांना विस्थापित करण्याचा विडा उचललाय. टॉवरवाल्यांना मासळीचा वास येतो म्हणून माहीममधील मासळी बाजारावर बुलडोजर चालवण्यात आला. क्रॉफर्ड मार्केटमधला कित्येक दशके जुना घाऊक मासळी बाजार ऐरोलीत हलवण्यात आला. नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी हजारो आगरी बांधवांनी मोर्चा काढला, परंतु शिवसेना पक्षप्रमुखांना त्यांच्याशी साधकबाधक चर्चा करण्याची गरज वाटली नाही. शिवसेना भूमीपुत्र असलेल्या कोळी- आगरी बांधवांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. मराठी अस्मितेच्या नावाखाली शिवसेनेने मराठी माणसाचे हित केले नाही, खरे तर कोणाचेही हित केले नाही. शिवसेनेच्या राज्यात ज्यांच्याकडे पैशाच्या थैल्या आहेत अशाच लोकांची चलती आहे.

‘कोविडच्या काळात बाळासाहेबांच्या नावाखाली हडप केलेल्या महापौर बंगल्यात फक्त बिल्डरांची गर्दी असते’, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या गर्दीत किती मराठी बिल्डर आहेत? किती मराठी कंत्राटदारांना शिवसेनेने मोठे केले? किती मराठी उद्योजकांना पाठबळ दिले? प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांच्या औरंगाबादेतील फॅक्टरीत शिरून गुंडांनी नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. मराठी अस्मितेच्या बाता करणाऱ्या शिवसेनेच्या राज्यात हे घडले.
शिवसेनेच्या बातांना कृतीची जोड नसल्यामुळे त्या केवळ वाफा ठरतायत. लोकांचा त्यावर विश्वास नाही. बेळगावात शिवसेनेच्या प्रचाराचा बाजार उठला त्याचे कारण हेच आहे.

बेळगावचा पराभव संजय राऊतांना झोंबला त्याचे मराठी अस्मितेशी घेणे-देणे नाही. मराठी अस्मितेचे कार्ड लोकांनी नाकारले याचे दु:ख त्यांना जास्त आहे. शिवसेनेच्या हाती असलेल्या महापालिकांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचाराचा नंगा नाच सर्वांना ठाऊक आहे. त्यात मराठी अस्मितेचे ट्रम्पकार्ड चालेनासे झाले तर दुकान पार बंद होईल याची शिवसेना नेतृत्वाने धास्ती घेतली आहे. शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता नाही, हे लोकांच्या लक्षात येतेय हे शिवसेना नेत्यांचा रक्तदाब वाढण्याचे प्रमुख कारण. जे बेळगावात झाले, ते मुंबई-ठाण्यातही घडणार ही धास्ती शिवसेना नेत्यांच्या त्राग्यामागे आहे. बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है… ही भीती आता पुढचे अनेक महिने शिवसेना नेतृत्वाची झोप उडवणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version