श्रीरंग बरगे यांचा आरोप
सेवानिवृत्त झालेल्या मुंबई विभागातील तसेच एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना मिळवून देण्यामध्ये एसटी प्रशासनाच्या “लेखा” विभागाने दिरंगाई केल्यामुळे गेली तीन वर्षे निवृत्त झालेले हजारो एसटी कर्मचारी त्यांच्या हक्काच्या पेन्शन पासून वंचित आहेत. ही पेन्शन संबंधित लेखा विभागाने गिळंकृत केल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांची कर्मचारी पेन्शन योजना १९९५ दि. १५.११.१९९५ पासून लागू करण्यात आली. त्यामुळे केन्द्र सरकार निश्चित करेल ती रक्कम पेन्शन अंशदान म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा कपात करून ती कर्मचारी भविष्य निधी संघटनकडे महामंडळ जमा करत असते.
कर्मचाऱ्यांच्या अंशदानात रक्कमेत केंद्र सरकारने वेळोवेळी वाढ केलेली असून सध्या रुपये १ हजार २५० एवढी रक्कम एस.टी. महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महा अंशदान स्वरूपात कपात करण्यात येत आहे. कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पेन्शनचे दावे संबंधित प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधि संगठन कार्यालयाकडे महामंडळाकडून पाठवले जातात व त्याची पडताळणी करुन संबंधित कार्यालय Pension Payment Order प्रसारित करत असते. महामंडळाच्या सर्वच विभागात किमान दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत पेन्शन सुरू करण्यात आली आहे याला अपवाद मुंबई विभाग आहे.
आयुक्त, प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संगठन, बांद्रा, मुंबई येथिल डेक्स ७६ (MH/16630) कडे मुंबई विभाग व मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांचे मिळून सन २०१७ पासून अद्याप पर्यंत सुमारे २ हजार २५० कर्मचाऱ्यांचे पेन्शन दावे वेगवेगळ्या कारणांनी प्रलंबित आहेत अशी माहीती आहे. यापैकी ४६५ कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू होण्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची पत्नी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी कार्यालय, बांद्रा कार्यालयात येरझाऱ्या घालत आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांना pension payment order अद्यापही मिळालेले नाहीत.
हे ही वाचा:
मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय
पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन
संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!
सुनिल बर्थवाल, भा.प्र.से., केन्दीय भविष्य निधी आयुक्त यांनी त्यांचे अर्धशासकीय पत्र क्र. pension/prayaas/2021/38755 दि.६.९.२०२१अन्वये अशा सूचना दिल्या आहेत की, कर्मचारी पेन्शन योजना लागू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना Pension Payment Order त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी देण्यात यावी. याबाबत सखोल माहीती घेतली असता असे समजते की, कर्मचारी भविष्य निधी संगठन, बांद्रा,यांनी पेन्शनचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत करण्याबाबत महामंडळास सन २०१२ मध्ये कळविले होते. परंतु, मध्यवर्ती कार्यालयातील प्रशासनाने व लेखा विभागाने अंमलबजावणी केली नाही. परिणाम स्वरुप पेन्शन दावे प्रलंबित राहीले आहेत. जर महामंडळाच्या प्रमुखांनी प्रलंबित पेन्शन दावे हा विषय प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी आयुक्त,बांद्रा यांच्याकडे मांडल्यास व त्याचा पाठपुरावा केल्यास यावर एक वेळचा पर्याय म्हणून मार्ग निघू शकेल. मात्र याबाबतचे कोणतेच प्रयत्न मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून होत नाहीत, असेही बरगे यांनी सांगितले.