पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती

पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला दिल्लीत गेलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. “नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील ताज्या घडामोडींविषयी चर्चा झाली.” अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर अनिल देशमुखांची खुर्चीही धोक्यात असल्याची चर्चा आहे.

“आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली.” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

पवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

“एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत केली जात आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल” अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली. गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. मात्र अनिल देशमुख यांची खुर्ची वाचवण्यात राष्ट्रवादीला यश मिळालेलं दिसत आहे. त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी करून हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली आहे.

Exit mobile version