काँग्रेसमधील हुकुमशाहीमुळे त्या पक्षाला फटका बसला. मला ३६२ मतं मला मिळाली. आम्ही ३१८ मतं नियोजिते केली होती. पण जनतेने काँग्रेसच्या हुकुमशाहीला हे उत्तर दिले आहे. त्यांची ४४ मतं फुटलेली आहेत. १८६ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हतबल होते तर दोन मंत्री दबाव टाकत होते. काँग्रेसला मतदारांनी जागा दाखविली. हतबल प्रदेशाध्यक्ष पक्ष चालवू शकत नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दांत नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत विजयी ठरलेले भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
बावनकुळे म्हणाले की, ३१८ मतं नियोजित होती, वरची मतं काँग्रेसच्या राजकारणामुळे मिळाली. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी दबाव आणला होता. निवडणुकीसाठी १२ तास राहिलेले असताना काँग्रेसचा उमेदवार बदलला. प्रथमच असं घडलं. जेव्हा नेते पक्षापेक्षा मोठं समजतात तेव्हा जनता त्यांना जागा दाखविते. भाजपाच यापुढे जिंकेल.
शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांना मतं दिली. काँग्रेसने हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालविला. आता पटोले यांनी आत्मचिंतन करावं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या राज्यातील आणि राष्ट्रीय स्तरावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची घोडदौड सुरू आहे. अकोल्यातली जागा तर भाजपाकडे नव्हती. मागे बाजोरिया भाजपामुळेच निवडून आले होते. भाजपाचा पाठिंबा होता म्हणून. पण भाजपाने पाठिंबा काढून घेतला आणि ते पराभूत झाले आहेत.
हे ही वाचा:
‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’
नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी
साहिर लुधियानवी आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विक्रम!
‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक
यासंदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यात अकोला वाशिम, नागपूर यांच्या निवडणुका होत्या. आमचे दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी झाले. याचा अर्थ राज्यात ज्यांनी धोका दिला, त्या शिवसेनेवर लोकांचा भरवसा राहिलेला नाही.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली असून त्यांना ४४३ मते मिळाली आहेत. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळविला.