भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पाकिस्तानची संसद बरखास्त केली आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंबलीचा पाच वर्षांचा संविधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.
नॅशनल असेंबली संविधानाच्या आर्टिकल ५८ नुसार भंग करण्यात आली आहे. संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरित्या १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता, असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती. आर्टिकल ५८ नुसार राष्टपतींनी पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार ४८ तासात संसद बरखास्त केली नाही तर ४८ तासानंतर संसद आपोआपच बरखास्त होते.
दरम्यान, पाकिस्तानच्या संविधानानुसार, संसद भंग झाल्यानंतर पंतप्रधान आणि नॅशनल असेंबलीच्या विरोधी पक्ष नेत्याने तीन दिवसात हंगामी पंतप्रधानांचे नाव राष्ट्रपतीकडे सूचवायचे असते. त्यानुसार पंतप्रधान शरीफ आणि विरोधी पक्ष नेत्याकडे काळजीवाहू पंतप्रधानांचे नाव सूचवण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. जर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावावर सहमती झाली नाही तर असेंबली स्पीकरद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीकडे हे प्रकरण नेले जाते. या समितीला तीन दिवसात नव्या काळजीवाहू पंतप्रधानांचे नाव सुचविणे बंधनकारक असते.
हे ही वाचा:
‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता
पुण्यातील दहशतवाद प्रकरणाचा तपास एनआयए करणार
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षिकेनेच घातला गणवेशात
‘सर्वोच्च, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी मालमत्ता जाहीर करावी’
यापूर्वी पंतप्रधान शरीफ यांनी बुधवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निरोपाचे भाषण केले होते. शिवाय हंगामी पंतप्रधानांच्या नावावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी विरोधी पक्षनेते राजा रियाज यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.