उच्च न्यायालयात पुन्हा घेतली धाव
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर यांच्याविरुद्ध ठाकरे सरकारच्या वतीने ज्या दोन प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे, त्यातून सुटका व्हावी यासाठी ही याचिका त्यांनी केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता. तसेच, राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. उच्च न्यायालयात ४ मे रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच
राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या प्रमाणात लसींचे डोस पुरवले जात आहेत
रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत परमबीर यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान देशमुख यांच्याविरोधात राज्य सरकारला लिहिलेले पत्र मागे घेण्याचा दबाव आणण्यात आला. १९ एप्रिलला ही भेट झाली होती. त्यात पांडे यांनी परमबीर यांना असेही सांगितले की, सरकारच्या वतीने अनेक खटले दाखल करण्यात येणार आहेत. त्यापेक्षा देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घ्या. ते मागे घेतले गेले तर देशमुख यांच्याविरोधात सीबीआयचा तपास थांबेल.
न्यायालयाने रोहतगी यांना विचारले की, या चौकशीसंदर्भात परमबीर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती का, त्यावर अशी नोटीस मिळालेली नसल्याचे रोहतगी यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने जर कारणे दाखवा नोटीस नसेल तर या चौकशीला स्थगिती देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
१ एप्रिलला पोलिस महासंचालक संजय पांडे यांना अंबानी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर परमबीर यांची चौकशी करण्यास राज्य सरकारने सांगितले होते तर २० एप्रिलला पो. निरीक्षक अनुप डांगे यांच्या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यास पांडे यांना आदेश देण्यात आले होते.