ओबीसी आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

ओबीसी आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. बुधवार, २३ जून रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांनी केली आहे. तर ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्‍या निवडणुका सरकारने रद्द कराव्यात असा पवित्राही पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आरक्षणाशिवाय राज्यातील निवडणुका होणे हे समाजासाठी धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले. तर ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सरकारला मिळत नसेल तर राज्य सरकारने निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सरकार इम्पिरिकल डाटा नाही म्हणून आरक्षण देणे टाळत आहे असा आरोप त्यांनी केला. सोबतच सरकारने हा डाटा मिळवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची अर्थात कृती दलाची स्थापना करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण इम्पिरिकल डाटा नाही म्हणून अडले आहे हे अमान्य असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर ओबीसी आरक्षणाच्या बाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पंकजा यांनी सांगितले.

जिल्हा परिषद येथील रद्द झालेले ओबीसी जागांवर पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे त्यासंबंधीची घोषणाही त्यांनी केली आहे या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून लढविल्या जाणार आहेत पण जोवर ओबीसींचे आरक्षण परत मिळत नाही तोवर या निवडणुका घेण्यात येऊ नयेत असा पवित्रा पंकजा मुंडे आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी घेतला आहे.

हे ही वाचा:

मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांची ९३७१ कोटींची संपत्ती ईडी बँकांना देणार

मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु

या विषयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आक्रमक झाले असून त्यांनीदेखील सरकारवर तोफ डागली आहे. या निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपा उग्र आंदोलन करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

Exit mobile version