ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, त्याचा निषेध करण्यासाठी पालघर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालघरचे भाजपा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुंडन करत सरकारच्या अपयशाचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात मुंडन केल्यानंतर बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की, छत्रपती शाहु महाराजांची आज (शुक्रवारी) १००वी पुण्यतिथी आहे. मात्र आज या दिवशी ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. महाराष्ट्रातील तिघाडी सरकारने केवळ वसुलीचे कार्य केले. पण ओबीसी समाजाकडे साफ दुर्लक्ष केले. आम्हा ओबीसींचा मायबापच हरवल्यामुळे मी मुंडन केले आहे. या सरकारचा जाहीर निषेध. ओबीसी के सम्मान मे, भाजपा मैदान मे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. फक्त भाजपा अशी एकमेव पार्टी ओबीसीसाठी लढा देत आहे, असेही प्रशांत पाटील म्हणाले.
प्रशांत पाटील म्हणाले की, वाईट वाटते की, ज्या छत्रपतींनी आम्हाला आरक्षण दिले तिथे आज ओबीसींचा विसर पडला आहे. सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही. सतत न्यायालयात अपयशी ठरणारे हे सरकार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत चालढकल केली. भाजपा सरकार असताना या विषयावर त्यांनी चांगली बाजू मांडली गेली. पण या सरकारने ओबीसींना निराधार केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई
दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा
पूनावाला यांनी हनुमानचालिसा म्हणत शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची केली गोची
ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला अपयश आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे. त्यानुसार आता येत्या काळात या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने या महिन्यात १५ तारखेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभा घेणार आहेत. त्याआधी १४ तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा आहे.