भारतातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेत्यांना काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा पुळका आल्याचे चित्र आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून राहुल गांधींच्या कामावर स्तुतिसुमने उधळण्याचे काम सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी नेते आणि इम्रान खान यांचे निकटवर्ती फवाद चौधरी यांनी ‘एक्स’ वर काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले होते की, “राहुल इज ऑन फायर.” शिवाय एका मुलाखतीत राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच आता पुन्हा एकदा फवाद खान यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.
“राहुल गांधी हे त्यांचे आजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे आहेत. ते जवाहरलाल नेहरूंसारखे समाजवादी आहेत. फाळणीच्या ७५ वर्षानंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सारखीच आहे. राहुल गांधी यांनी भाषणात म्हटले की ३०-५० कुटुंबाकडे भारताच्या एकूण संपत्तीचा ७० टक्के हिस्सा आहे. अशीच अवस्था पाकिस्तानात आहे. जिथे केवळ बिझनेस कौन्सिल नावाच्या बिझनेस क्लब आणि काही रिअल इस्टेटकडे पाकिस्तानच्या संपत्तीचा ७५ टक्के हिस्सा आहे. संपत्तीचे न्याय्य वितरण हे भांडवलशाहीचे सर्वात मोठे आव्हान आहे” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे राहुल गांधी हे टीकेचे धनी झाले आहेत.
Rahul Gandhi like his great Grandfather Jawaharlal has a socialist in him, problems of India and Pak are so same even after 75 years of partition, Rahul sahib in his last night speech said 30 or 50 families Owns 70% of India wealth so is in Pakistan where only a business club…
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) May 4, 2024
काही दिवसांपूर्वीचं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने भारतीय नेत्यांना भारतातील निवडणुकांदरम्यान राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानला त्यात ओढू नका, असे आवाहन केले होते. याच्या काही दिवसांनंतरचं बुधवार, १ मे रोजी पाकिस्तानी नेते आणि इम्रान खान यांचे निकटवर्ती फवाद चौधरी यांनी ‘एक्स’ वर काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यावर लिहिले होते की, राहुल इज ऑन फायर. यावर भाजपा नेते अमित मालवीय, शहजाद पूनावाला म्हणाले की, “राहुल यांचा पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्याचा मानस असल्याचे दिसते.” शिवाय नरेंद्र मोदी यांनीही ही बाब बोलून पाकिस्तान आणि काँग्रेसचे संबंध असल्याचे सभेतील भाषणातून बोलून दाखविले होते.
हे ही वाचा:
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
तसेच एका मुलाखतीत बोलताना पाकिस्तानी नेते फवाद चौधरी म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरिबांच्या हक्कांबद्दल बोलले आहेत. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. यापेक्षा भारतीय राजकारण कोणीही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत नाही म्हणून त्यांना पाठिंबा दिला. गरीब माणूस भारतीय राजकारणातून केव्हाच निघून गेला आहे, उद्योगपतींचा भारत झाला आहे. आम्ही भारतीय राजकारणात ढवळाढवळ करत नाही, फक्त योग्य गोष्टीला पाठिंबा देत आहोत. भारतात भाजपचे सरकार येऊ नये, मोदींना रोखणे गरजेचे आहे, बाकी कोणीही येईल, आम्ही त्याला साथ देऊ. राहुल पाकिस्तानशी शांततेची चर्चा करतात, लोकांनी त्यांना मतदान करावे,” असं ते म्हणाले होते.