मोदी फॅक्टर, पाकिस्तानची शांततेची बांग

मोदी फॅक्टर, पाकिस्तानची शांततेची बांग

“पाकिस्तान हा परस्परांचा आदर आणि शांततेच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारा आहे. आता सर्व प्रकारच्या शांततेची गरज आहे.” असे धक्कादायक विधान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी केले आहे. एरवी भारतविरोधी गरळ ओकणाऱ्या लष्करप्रमुखाचे हे विधान अचंबित करणारे आहे. यापूर्वी बाज्वा यांनी दिल्लीवर पीओकेमधील भारताच्या २०१९ मधल्या एअर स्ट्राईक आणि जम्मू काश्मिरचे विशेषाधिकार रद्द झाल्यानंतर टिका केली होती.

जनरल बाज्वा हे पाकिस्तानी हवाई दलाच्या पदवीदान समारंभात बोलत होते. या वेळी बोलताना आश्चर्यकारकरित्या त्यांनी भारत विरोधाचा सूर नरम केला होता. ते असेही म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला जम्मू आणि काश्मिरचा प्रश्न सन्मानजनक मार्गाने आणि शांततेने सोडवला पाहिजे. हा तोडगा जम्मू आणि काश्मिरच्या लोकांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा असावा.

भारताने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार हे केवळ एक विधान आहे की त्यांच्या भूमिकेतील काही बदल आहे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या वक्तव्यातील नरमाईचा सूर इम्रान खान यांच्या विरोधातील असंतोष वाढत असताना लावण्यात आला आहे.

Exit mobile version