“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”

गुजरातमधील सभेतून पाकिस्तान आणि काँग्रेसमधील भागीदारीचे सत्य नरेंद्र मोदींनी केले उघड

“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २ मे गुजरातमधील आनंद येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानला भारतात काँग्रेसचे सरकार हवे आहे, तशी पाकिस्तानी नेत्यांची इच्छा असल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले. “इथे काँग्रेस मरत आहे आणि तिथे पाकिस्तान रडत आहे, काँग्रेस आणि पाकिस्तानची भागीदारी उघड झाली आहे,” अशी घाणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “आजकाल काँग्रेसचे नेते संविधानाबाबत बोलत आहेत. पण, तेचं संविधान ७५ वर्षे भारताच्या सर्व भागात का लागू झाले नाही, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. आज भारतात काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. गंमत म्हणजे इथे काँग्रेस मरत आहे आणि तिथे पाकिस्तान रडत आहे. आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तान शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे आणि काँग्रेस पाकिस्तानची चाहती आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही भागीदारी आता पूर्णपणे उघड झाली आहे,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी वक्तव्य केले होते की, “काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरिबांच्या हक्कांबद्दल बोलले आहेत. तसेच त्यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. यापेक्षा भारतीय राजकारण कोणीही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत नाही, म्हणून त्यांना पाठिंबा दिला. गरीब माणूस भारतीय राजकारणातून केव्हाच निघून गेला आहे, उद्योगपतींचा भारत झाला आहे. भारतीय राजकारणात ढवळाढवळ करत नाही, तर फक्त योग्य गोष्टीला पाठिंबा देत आहोत. भारतात भाजपचे सरकार येऊ नये, मोदींना रोखणे गरजेचे आहे, बाकी कोणीही येईल, आम्ही त्याला साथ देऊ. राहुल जी पाकिस्तानशी शांततेची चर्चा करतात, लोकांनी त्यांना मतदान करावे.” यावरूनच भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी असेही म्हणाले की, “देशाने ६० वर्षे काँग्रेसची राजवट पाहिली आहे. आता देशाने भाजपचा १० वर्षांचा सेवेचा कालावधीही पाहिला आहे. काँग्रेसची राजवट होती आणि हा सेवेचा काळ आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीत सुमारे ६० टक्के ग्रामीण लोकांकडे शौचालये नव्हती. भाजप सरकारने १० वर्षात १०० टक्के शौचालये बांधली. ६० वर्षात काँग्रेस देशातील ३ कोटी ग्रामीण घरांना म्हणजेच २० टक्केपेक्षा कमी घरांना नळाच्या पाण्याची सुविधा देऊ शकली. पण, अवघ्या १० वर्षांत नळपाणी पुरवठा असलेल्या घरांची संख्या १४ कोटी झाली आहे, म्हणजेच ७५ टाळले घरांना नळाने पाणीपुरवठा आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

हे ही वाचा:

“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”

दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?

अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

“६० वर्षांत काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, बँका ताब्यात घेतल्या आणि बँका गरिबांसाठी असायला हव्यात असे सांगितले. गरिबांच्या नावाने बँकांचे राष्ट्रीयीकरण करूनही काँग्रेस सरकारला ६० वर्षांत करोडो गरिबांची बँक खाती उघडता आली नाहीत. मोदींनी १० वर्षात ५० कोटींहून अधिक जन धन बँक खाती उघडली,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मुस्लिमांना अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी काँग्रेस भारताचे संविधान बदलू इच्छित आहे,” असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसेच त्यांनी काँग्रेसला आव्हान देत म्हटले की, “मी काँग्रेसला आव्हान देतो की ते धार्मिक आधारावर आरक्षण देण्यासाठी संविधान बदलणार नाहीत, असे लेखी द्या.”

Exit mobile version