दाऊद, हाफिजवरून प्रश्न विचारल्यावर पाक अधिकाऱ्याचे हाताची घडी, तोंडावर बोट

दिल्लीतील इंटरपोलच्या बैठकीत विचारला होता सवाल

दाऊद, हाफिजवरून प्रश्न विचारल्यावर पाक अधिकाऱ्याचे हाताची घडी, तोंडावर बोट

दिल्लीत तब्बल २५ वर्षांनंतर भारतात होत असलेल्या ९०व्या इंटरपोलच्या परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिझ सईद यांना भारताकडे कधी सोपविण्यात येणार या प्रश्नावर पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची बोलती बंद झाली. ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

दिल्लीच्या प्रगती मैदानावर ही इंटरपोलची बैठक सुरू आहे. त्यात पाकिस्तानच्या एफआयए या गुप्तचर संघटनेचे महासंचालक मोहसिन बट यांना विचारण्यात आले की, दाऊद आणि हाफिज सईद यांना भारताकडे कधी सुपूर्द करण्यात येईल, त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

या दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानातच शरण देण्यात आल्याचे पुरावे अनेकवेळा समोर आलेले असतानाही पाकिस्तान यावर गप्प आहे. दाऊद इब्राहिम हा मुंबईत १९९३ला केलेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आहेच तर हाफिज सईद हा २६/११ला मुंबईत झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आहे. मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीत या दोघांचाही समावेश आहे. म्हणूनच बट यांना या दोघांविषयी विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

या बैठकीत १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. त्यात देशातील मंत्री, पोलिस प्रमुख, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख यांचा समावेश आहे. १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ही बैठक होणार आहे. यात इंटरपोलच्या कामकाजाचे विश्लेषण केले जाते तसेच अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले जातात.

ही बैठक २५ वर्षानंतर भारतात होत आहे. याआधी १९९७मध्ये भारतात ही परिषद झाली होती. पण यावेळी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या बैठकीचे भारतात आयोजन करण्यात आले.

Exit mobile version