आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी रविवारी ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा संजय राऊत यांनी विडाच उचलला आहे की काय, अशा शब्दांत पडळकर यांनी राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे.
संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमध्ये प्रियांका गांधी यांची स्तुती करणारा लेख लिहिल्यानंतर त्यावर पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशला गेल्या आणि त्यांनी त्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पण त्याआधी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले होते. त्यावरून संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
जनाब #संजय राऊत यांनी #सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण #कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय.#BJPMaharashtra pic.twitter.com/i9jQI46gRy
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2021
भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राऊत यांनी सातत्याने शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसची तळी उचलून धरण्याचा सपाटा लावला आहे. त्यालाच अनुसरून पडळकर यांनी ही टीका केली आहे.
हे ही वाचा:
सीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स
मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र
तब्बल २१ वर्षांनंतर तरी ती ‘जखम’ भरून निघेल?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी सातत्याने काँग्रेसवर जोरदार प्रहार केले होते. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यावर जहरी टीका ही शिवसेनेची ओळख होती. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मात्र शिवसेनेने काँग्रेसचा जणू प्रचारच आपल्या मुखपत्रातून सुरू केला की काय, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.