दरेकर, पडळकर यांनी विचारला एसटी अधिकाऱ्यांना सवाल
वेतन नाही, आत्महत्यांचे वाढते प्रमाण, एसटीची दुर्दशा यामुळे पिचलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्यानंतर त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र नाराजी प्रकट केली आहे. त्यांनी यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन ही नाराजी परखड शब्दांत व्यक्त केली.
यावेळी पडळकर यांनी चन्ने यांना सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आहे की नाही? त्यांना पगार मिळत नाही तुम्हा अधिकाऱ्यांना मात्र पगार मिळतो. कर्मचाऱ्यांची बायकापोरं नाहीत का? त्यांची पण दिवाळी आहे ना? त्यावर पडळकर म्हणाले की, त्यांची दुखणी समजून घ्या! इतक्या आत्महत्या झाल्या पण तुम्ही भेटलात का त्यांना? एसटी युनियनवाले काहीही भूमिका मांडतील. तुमच्या सरकार, महामंडळाचं कुणी भेटलं का त्यांना? आतापर्यंत ३० लोकांनी आत्महत्या केल्या. परवा ड्रायव्हरच्या मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला. कधी देणार त्यांच्या नातेवाईकांना नोकरी. पण त्यांना भेटायला कुणीही गेलेले नाही.
दरेकर यांनी सांगितले की, तुम्हाला मंत्र्यांनी सांगितले का, या कर्मचाऱ्यांना भेटू नका. लोक मरत आहेत पण अहंकार जपला जात आहे. त्या कर्मचाऱ्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना भोगावे लागणार गंभीर परिणाम
माजी खासदार पुंडलिक दानवे यांचे निधन
मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या चौघांना फाशी
पडळकर म्हणाले की, युनियनच्या लोकांना चर्चेसाठी बोलावू नका. विभागीय कर्मचाऱ्यांना बोलवा. जिथे आंदोलन होतायत तिथल्या प्रतिनिधींना बोलवा. मी पाहिल्या आहेत ५ हजार, ८ हजारच्या पगाराच्या स्लिप. एसटी बँकेचं तर पठाणी व्याज चालू आहे. एसटीच्या बँकेत हजारोंच्या ठेवी आहेत. इतक्या ठेवी असून तुम्ही कर्मचाऱ्यांना न्याय देत नाहीत. माणूसकीच्या नात्याने विचार करा.