31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामामालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर 'अँटिलीया ' बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.

मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.

Google News Follow

Related

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू ठाणे येथे झाला. ठाणे येथील मुंब्र्याजवळच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. फडणवीस यांनी हिरेन यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत केली होती.

२५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या निवासस्थानाबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनसुख हिरेन यांची नेमकी तक्रार काय होती?
विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणातील योगायोगांची मालिका उलगडली. मनसुख हिरेन यांनी आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत हिरेन म्हणतात “मी दिनांक १७ रोजी क्रॉफर्ड मार्केट इथे एका परिचितांना भेटण्यासाठी माझ्या स्कॉर्पिओ गाडीतून जात होतो. जाता जाता मुलुंडपुढे ऐरोलीजवळ सर्व्हिस रोडच्या इथे गाडीचे स्टिअरिंग जॅम झाले. त्यामुळे गाडी तिथेच पार्क करून ओला कॅब बुक करून मी क्रॉफर्ड मार्केट येथे गेलो.” असे हिरेन यांनी आपल्या गाडी चोरीच्या तक्रारीत म्हटले आहे.

धमकीच्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?
हिरेन यांची गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली होती. त्यावेळी एक धमकीचे पत्रही सापडले होते ज्यात जैश-उल-हिंद या संघटनेने या स्फोटकांची जबाबदारी घेतल्याचे म्हटले होते. “ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तो सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, ‘पिक्चर अभी बाकी है।‘ जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केलं, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हतात. तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली, पण काही झालं नाही. (अंबानींना उद्देशून) तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे. तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा.” असा मजकूर त्या धमकीच्या पत्रात आहे.

त्या पत्रात क्रिप्टो करंन्सीचा एक खाते क्रमांक देण्यात आला आहे जो खोटा आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात जैश चे नाव घेतल्यानंतर जैश-उल-हिंदने एक पत्रक प्रसिद्ध करत या प्रकरणात आपला काहीही हात नसल्याचे म्हटले आहे.

सचिन वाझे यांच्या भोवती फिरणारी योगायोगांची मालिका
त्या दिवशी अंबानी यांच्या घराबाहेर एक नाही तर दोन गाड्या आल्या, दोन्ही गाड्या ठाण्यातूनच आल्या आणि एकाच मार्गाने आल्या. एक स्कॉर्पिओ आणि दुसरी पांढऱ्या रंगाची इनोव्हा होती. स्फोटकांनी भरलेली गाडी जेव्हा आढळून आली तेव्हा तिथे सर्वात आधी सचिन वाझे पोहोचले. ना स्थानिक पोलीस ना क्राईम ब्रँचचे कोणी अधिकारी पोहोचले. फक्त सचिन वाझे पोहोचले. धमकीचे पत्रही सचिन वाझेंनाच मिळाले. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे दोघेही राहायला ठाण्यात आहेत. एकमेकांच्या संपर्कात होते कारण त्यांचे अनेकदा फोनवर बोलणे झाल्याचे कोळ रेकॉर्ड्स वरून स्पष्ट होते. या प्रकरणात पहिले सात दिवस सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पहिले. पण नंतर तपास अधिकारी बदलण्यात आले.

या योगायोगाची मालिका उलगडून तपास करण्यासाठी हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यासोबतच मनसुख हिरेन हे क्रॉफर्ड मार्केटला नक्की कोणाला भेटले याचा तपास व्हावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची नाहीच: – अनिल देशमुख
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांची नसल्याचा दावा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला आहे. सॅम न्युटन हे या गाडीचे खरे मालक आहेत. ती गाडी मनसुख हिरेन यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. त्याचे बिल भरू न शकल्याने त्यांनी गाडी ठेवून घेतली होती असे गृहमंत्र्यानी सांगितले. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा सापडल्या नसून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळेल अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. मुंबई पोलीस, ठाणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस सक्षम असून हा तपास राष्ट्रीय तपस यंत्रणेकडे सोपवण्याची गरज नाही असेही देशमुख म्हणाले.

पुरावे केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार: देवेंद्र फडणवीस
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेस देण्यात यावा ही मागणी केल्यानंतर या प्रकरणातले पुरावे केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मनसुख हिरेन प्रकरणात पत्रकारांशी बातचीत करताना फडणवीसांनी ही माहिती दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा