उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेशमध्ये शिवपाल यादव यांची भेट घेतली. शिवपाल यादव हे समाजवादी पार्टीचे (एसपी) संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे भाऊ आहेत. २०१७ मधील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मुलायम सिंग यांचे चिरंजीव आणि तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी तंटे झाल्यामुळे शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या या नव्या पक्षाचे नाव प्रगतीशील समाजवादी पार्टी (पीएसपी) असे आहे.

असदुद्दीन ओवैसी हे मुसलमानांचे नेते मानले जातात. भारतातील विविध राज्यांमध्ये मुसलमान मतांच्या जोरावर ओवैसी यांचे राजकारण चालते. हैदराबाद बाहेर त्यांना निवडणुकांमधील पहिले यश हे महाराष्ट्रातच मिळाले होते. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये सुद्धा विधासभा निवडणूक लढवून पाच जागा जिंकल्या. परंतु बिहारच्या २०२० मधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून असे लक्षात आले की, ओवैसी यांना केवळ पाचच जागा जिंकता आल्या असल्या तरी अनेक जागांवर मुस्लिम मते घेऊन त्यांनी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का दिला होता.

हे ही पाहा:

ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली

उत्तरप्रदेशमध्ये आणि त्यातही पश्चिम उत्तर प्रदेशात मुसलमानांची संख्या ही सरासरी ४०% च्या जवळपास आहे. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या भागातील बहुतांश जागा या भाजपाने जिंकल्या होत्या. २०२२ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर विरोधी पक्षांना मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करता आले नाही तर भाजपच्या जागा अजून वाढण्याची शक्यता आहे.

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तरप्रदेशच्या ४०३ विधानसभा मतदारसंघांपैकी ३१२ जागा या भाजपा ला मिळाल्या होत्या.

Exit mobile version