जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले हे लाॅकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी लाॅकडाऊनचा निषेध करताना अनोखे असे ‘भिक मागो’ आंदोलन केले. हे आंदोलन करताना उदयनराजे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर चांगलेच बरसले. “या राज्यातील गोरगरीब जनतेने जगायचे कसे?” असा सवाल उदयनराजेंनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात विकेंड लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. तर सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सरकारच्या या धोरणावर राज्यातील नागरीकांच्या मनात संताप असून ठिकठिकाणी नागरीकांनी ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केले आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या लॉकडाऊनचा विरोध करताना एक अनोखे आंदोलन केले. शनिवार, १० एप्रिल रोजी सकाळी उदयनराजे हे सातारा येथील पोवई नाका येथे पोहोचले. तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी शेजारील एका अंब्याच्या झाडाखाली एक पोते अंथरले आणि समोरच एक कटोरा ठेवत त्यांनी ‘भिक मागो’ आंदोलन केले. यावेळी बोलताना आपण या राज्यातील गोरगरिब जनते सोबत आहोत असे राजेंनी सांगितले, तर आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा रोष व्यक्त करत आहोत असेही ते म्हणाले.

यावेळी ठाकरे सरकारवर हल्ला चढवताना सचिन वाझे पासून सगळ्याच विषयांना त्यांनी हात घातला. एक साधा पोलीस अधिकारी असून एवढा पैसा कसा कमावतो असा सवाल त्यांनी केला. तर ‘लाख मेले तरी चालतील पण एक जगला पाहिजे’ अशी ठाकरे सरकारची निती असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उदयनराजे यांनी भिक मागत लोकांकडून ४५० रूपये जमा केले. आंदोलनानंतर त्यांनी चालत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले आणि तिथल्या प्रतिनिधींकडे ही रक्कम जमा केली. साताऱ्याच्या जिल्हाधीकारी कार्यालयातही फेरफटका मारत त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला.

Exit mobile version