खरंच, जीवितहानीसाठी शिवसेना सोडून बाकी सगळे जबाबदार

खरंच, जीवितहानीसाठी शिवसेना सोडून बाकी सगळे जबाबदार

आमदार अतुल भातखळकर यांनी काढला चिमटा

“मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच, काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या”…संजय राऊत. हो खरंच, पालिकेतील टक्केवारीजीवी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार आहे, मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे. सामनामध्ये अग्रलेख लिहून घडलेल्या दुर्घटना या अनैसर्गिक पावसामुळे घडल्याचे सांगत पालिका प्रशासनाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला आहे.

मुंबईत दरडी, भिंती कोसळून झालेले अपघात हे अनैसर्गिक पावसामुळे झालेत असा दावा करत महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, असे संजय राऊत यांनी अग्रलेखात नमूद केले आहे.

हे ही वाचा:
शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

‘हा’ निर्णय पंजाबमध्ये काँग्रेसला तारणार?

उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान

गेल्या दोन दिवसात मुंबईत पडलेल्या पावसामुळे मुंबईची दैना उडाली. चेंबूर, विक्रोळी येथे भिंती कोसळून जवळपास २२ लोक मृत्युमुखी पडले. शिवाय, शनिवारी रात्री कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे अवघ्या मुंबईत महापूर आल्यासारखी परिस्थिती होती. अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. भांडुप येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणीही मिळू शकले नाहीत.

या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनास्थळाला भेट न दिल्यामुळेही टीकेची झोड उठली. त्यावरही आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. अशा घटना मुंबईत घडत असतानाही मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. त्यांच्यासमोर हात टेकले, अशा शब्दांत ती उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version