नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश

नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीनच चिघळताना दिसत आहे. शिवसेना आणि राणे यांच्यात सध्या पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू आहे. पण अशातच नारायण राणे यांच्या नीलरत्न या बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण चिवला येथे समुद्र किनाऱ्यावर राणे यांचा नीलरत्न हा बंगला आहे. पण या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, अँड क्लायमेट चेंज यांच्या नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कारवाईच्या अनुषंगाने राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे

दरम्यान नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू भागातील अधिश या बंगल्याला नुकतीच मुंबई महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली होती. बंगल्याची पाहणी करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली असून महापालिकेचे अधिकारी नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी पोहोचले होते. पण त्यावेळी कोणतीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने ते पाहणी न करताच निघून गेले. त्यामुळे हा वाद ताजा असतानाच आता नीलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आल्यामुळे हे प्रकरण आणखीन टाकण्याचे चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता. सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू संदर्भात राणे यांनी भाष्य केले असून या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. तर यानंतर आता विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

Exit mobile version