काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे. आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदीया यांच्या सारख्या अन्य काही टुच्चे नेतेही ईडीच्या सापळ्यात अडकलेले दिसतात. देशातील अनेक राजकीय नेत्यांना ही ईडीबाधा झालेली दिसते. त्यातूनच ईडीच्या घाऊक वापरा विरुद्ध विरोधी पक्षांकडून जनमत निर्माण करण्याचा प्रय़त्न होतोय. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अघोषित आणीबाणीचे पर्व सुरू केले आहे. भाजपाला आव्हान देणाऱ्या राजकीय पक्षांना ईडीचा धाक दाखवून दाबण्याचा प्रयत्न होतोय, असे आरोप करून ईडीच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु प.बंगालमध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे विरोधकांच्या प्रयत्नांवर घडाभर पाणी पडले आहे. ईडीला बदनाम करण्याच्या मोहीमेला करकचून चाप बसला असून विरोधकांचे चारीत्र्य किती बरबटले आहे, त्याचा प्रत्यय या कारवाईमुळे येतो आहे.
पार्थ चटर्जी हे प.बंगालचे उद्योगमंत्री आहेत. अभिनेत्री अर्पिता मुखर्जी त्यांच्या निकटवर्तिय मानल्या जातात. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिताच्या कोलकात्यातील बेलघरीया आणि टॉलिगंज येथील घरांवर छापेमारी केली. या दोन्ही फ्लॅटमध्ये अपार घबाड सापडले आहे. बेलघरीया येथे नोटांचे ढीग सापडले असून नोटा मोजायला ईडीच्या अधिकाऱ्यांना १८ तास लागले. नोटांची रक्कम सुमारे ३० कोटी इतकी प्रचंड आहे. या नोटा नेण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना १० पेटारे मागवावे लागले. टॉलीगंज येथे दागिने, सोन्याच्या विटा, परकीय चलन आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. हे एकूण घबाड सुमारे ५० कोटी रुपयांचे आहे. अर्पिताची एकूण ३ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हे तर हिमनगाचे टोक आहे. बराच पैसा शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला आहे. हा जनतेच्या लुटीचा पैसा आहे. या लुटीत प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सहभाग नाही, असे छातीठोकपणे म्हणता येईल का?
ममतांची पकड राज्याच्या राजकारणावर आहे आणि सत्ताकारणावरही आहे. त्यांना अंधारात ठेवून एवढी माया जमवणे एखाद्या मंत्र्याला शक्य होईल. यापूर्वी सारदा घोटाळ्यातही त्यांचे नाव आले होते. अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून सुरू झालेला तपास ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहचण्याची दाट शक्यता आहे.
अर्पिता ही छोटीमोठी अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे दुकान उठून आता बराच काळ लोटला आहे. त्यामुळे पैसा जरी तिच्या घरात सापडला तरी तो तिचा नाही हे उघडच आहे. आपल्या घरात सापडलेला सगळा माल पार्थ चटर्जी यांचा असल्याची कबुली तिने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. आपल्याला ही रक्कम इतकी प्रचंड असेल याची कल्पनाच नव्हती कारण, ज्या खोलीमध्ये ही रक्कम ठेवली होती, तिथे जाण्याची मला परवानगीच नव्हती, असेही तिने सांगितले आहे. या घराच्या चाव्या सापडल्या नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजे फोडून खोलीत प्रवेश केला.
पार्थ चटर्जी हे प.बंगालचे उद्योगमंत्री म्हणजे ज्या राज्यात उद्योग औषधा एवढाही शिल्लक नाही तिथला उद्योगमंत्री. त्यामुळे पैशांचा हा ढीग कसा निर्माण झाला हे मोठे कोडे आहे. मलईदार मंत्रिपदावर नसलेला मंत्री जर एवढी माया कमावतो तर बाकीच्या मंत्रालयात काय परीस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी.
हे ही वाचा:
संजय राऊत यांचे हायकमांड म्हणजे सिल्व्हर ओक!
सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने
८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या
भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
प.बंगालच्या अनुदानित शाळांच्या भरती प्रक्रीयेत मोठा घपला झाल्याचा संशय स्कूल सर्व्हीस कमिशनने व्यक्त केला होता. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने याप्रकरणी चौकशी सुरू केली. या तपासात एकेक दुवा उघड होत गेला. त्याचे धागेदोरे पार्थ चटर्जी याच्यापर्यंत पोहोचले. चटर्जी केवळ मंत्री नाही, राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा तो सरचिटणीस आहे. ज्यावेळी क आणि ड वर्गातील कर्मचारी व शिक्षक भरतीचा हा घोटाळा घडला तेव्हा चटर्जीकडे शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी होती. चटर्जीला याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली आणि तपासासाठी त्याला ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कांचन आणि कामीनीचा हा मामला आहे. नोटांच्या ढिगाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसची अब्रू चव्हाट्यावर काढली. लोकलाजेखातर ममतांना पार्थ चटर्जी यांची पक्षातून हकालपट्टी करावी लागली. ही हकालपट्टी शनिवारी त्यांच्या अटकेनंतर लगेचच झाली असती तर पक्षाची मूठ झाकली राहिली असती. परंतु आज झालेली ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडं असा प्रकार आहे. अर्थात दाऊदशी संबंध उघड झाल्यानंतर आणि तुरुंगात गेल्यानंतरही नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या निलाजऱ्या कारभारापेक्षा ममता बऱ्या असे म्हणावे लागेल.
हा सगळा मामला उघड झाला असताना ईडीच्या विरोधात रान उठवणारे देशभरातील राजकीय पक्षांचे नेते मिठाची गुळणी करून बसले आहेत. ईडीच्या विरोधात बोलणारे या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. त्यामुळे हे नेते भ्रष्टाचार मोहीमेचे विरोधक असून भ्रष्टाचाराला मात्र त्यांचा विरोध नाही हे स्पष्ट झाले आहे. देशात विरोधक इंधनाचे वाढते दर, महागाई या मुद्यांवर सर्वसामान्य जनतेची कड घेतल्याचा आव आणतो आहे. परंतु हीच मंडळी आपआपल्या राज्यात प्रचंड भ्रष्टाचार करून जनतेला लुबाडतायत. प.बंगालमध्ये पार्थ चटर्जीने कमावलेली माया नोकरीसाठी गोरगरीबांनी लाच म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपयांतूनच जमा झालेली आहे.
शिक्षक पैसे देऊन भरती झाले, त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावरही निश्चितपणे होणार. त्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार, ज्यांना उद्धारासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्व स्तरात झिरपलेला भ्रष्टाचार समाजाला एखाद्या वाळवीसारखा पोखरतोय. ईडीसारख्या संस्था हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. काळा पैसा संपवण्यासाठी केंद्र कटीबद्ध आहे. परंतु विरोधी पक्ष या मोहीमेत सर्वात मोठा अडथळा बनला आहे. भ्रष्टाचाराला समर्थन आणि भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला विरोध अशा प्रकारचा उफराटा कारभार विरोधी पक्षांनी चालवलेला आहे. प.बंगालमध्ये करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईने यावर झळझळीत प्रकाश पडला.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)