भय इथले संपत नाही…

भय इथले संपत नाही…

१४ पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात ईडी आणि सीबीआयच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. देशात डर का माहोल है. हा माहोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केलेला आहे. मोदी हे नाकारत सुद्धा नाहीत. हे कमी होते म्हणून की काय, देशातला एकही भ्रष्टाचारी सुटायला नको, असा आदेश मोदींनी काल सीबीआयच्या हिरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलेला आहे. महाराष्ट्रात अनेकांची कढी पातळ झाली आहे.

मोदींमुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे. हीच मंडळी कधी लोकशाही बुडाली म्हणून तर कधी घटना वाचवण्याच्या नावाखाली ओरड करून ही आग थंड करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिउबाठा या दोन पक्षात पंतप्रधान मोदींच्या विरोधात अनर्गल टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. गौतम अदाणींना का वाचवतायत, किरीट सोमय्यांना का पाठीशी घालताय असा सवाल वाचाळ शिरोमणी संजय राऊत यांनी विचारला आहे.   काँग्रेसचे तोंडाळ नेते त्यांच्या ट्विटरवर मोदींचा उल्लेख मोडाणी असा करतात. छत्रपती संभाजी नगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनीही मोदींच्या विरोधात गरळ ओकली. नोटबंदीपासून मोदींनी केलेल्या जखमा अजून ओल्या असताना रोज नव्या जखमा होत असल्यामुळे ही ओरड आहे.

माणूस जेव्हा प्रचंड बिथरलेला असतो तेव्हा तो शिवीगाळ करू लागतो. महाराष्ट्रातील विरोधकांचे सध्या तेच सुरू आहे. बरेच दिवस थंड पडलेल्या पत्राचाळीच्या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाधवान बंधूंच्या मालकीची गोव्यातील सुमारे ३१ कोटी रुपये किंमतीची जमीन ईडीने जप्त केली. त्यामुळे राऊतांच्या पोटात गोळा उठणे स्वाभाविकच होते. राऊत या पत्राचाळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका ईडीने त्यांच्या आरोपपत्रात ठेवलेला आहे.

हे ही वाचा:

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

१४ देशात दडून बसलेत भारतातील २८ वाँटेड गुंड

राऊत सध्या याप्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. त्यांना पुन्हा एकदा तुरुंगाच्या उंच उंच भिंतींची आठवण झाली असण्याची शक्यता आहे. त्यांनी ट्विटरवरून केलेल्या शरसंधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा योग्य समाचार घेतलेला आहे. ‘मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका थुंकी तुमच्या तोंडावरच पडेल’, या शब्दात त्यांना सुनावले आहे. मोदींमुळे विरोधकांची इतकी आग का होतेय त्याची कारणे अज्ञात नाहीत. ती सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आणि स्वच्छ आहेत. काल सोमवारी सीबीआयच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात मोदी जे बोलले ते ऐकून अनेकांच्या पोटात मुरडा आला असेल.   ‘देशात भ्रष्टाचाऱ्यांनी एक इको सिस्टीम बनवली आहे. जेव्हा भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होते ही इको सिस्टीम त्यांना वाचवण्याचे काम करते. केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल करते, त्यांना बदनाम करण्याचे काम करते. तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका, कामावर फोकस ठेवा. देशात एकही भ्रष्टाचारी सुटायला नको.’ मोदींची आतषबाजी ऐकून आधीच गर्भगळीत झालेल्या भ्रष्ट नेत्यांचे काय झाले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

मोदींच्या वक्तव्यामुळे देशभरातील भ्रष्टाचारी पिसाळले आहे. त्यातूनच अनेकांच्या तोंडाचे गटार बनले आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी इंडिया टीव्हीवर मोदींची एक मुलाखत झाली होती. त्यात ज्येष्ठ पत्रकार रजत शर्माने मोदींना प्रश्न केला, फक्त पाकिस्तान नाही, सोनिया, चिदंबरम, वाड्रा सगळेच तुमच्या मुळे भयभीत का आहेत? मोदींनी त्याला दिलेले उत्तर त्यांचे इरादे स्पष्ट करणारे आहे. ‘भ्रष्टाचाऱ्यांमध्ये हे भय असायलाच हवं.

ज्या देशात भ्रष्टाचाऱ्यांच्या मनात, अनैतिक धंदे करणाऱ्यांच्या मनात ही भीती नष्ट होते, तेव्हा तो देश नष्ट होतो.’ मोदींना काय करायचे आहे, हे त्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट केले आहे. देशभरात भ्रष्टाचाऱ्यांना घोडा लावण्याचे काम सुरू आहे, त्याचे सुपरीणामही आता दिसू लागलेत. भ्रष्टाचारविरोधी कारवाईचे आकडे अत्यंत बोलके आहेत. यूपीएच्या २००४ ते २०१४ या कार्यकाळात देशात पीएमएलए कायद्यांतर्गत पाच हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. मोदींच्या कार्यकाळात हा आकडा एक लाख १० हजार कोटींचा आहे.

सीबीआयने यूपीएच्या कार्यकाळात भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात ५०० पेक्षा कमी गुन्हे दाखल करण्यात आले. मोदींच्या कार्यकाळात हा आकडा पाच हजार पेक्षा जास्त आहे. ही सगळी भ्रष्टाचाऱ्यांमध्ये भय निर्माण करणारी आकडेवारी आहे. भ्रष्टाचार बंद झाल्यामुळे देशाचा पैसा वाचतोय. मोदी सरकारने मोबाईल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याचा उपक्रम हाती घेतल्यामुळे देशातील ८ कोटी बोगस खाती बंद झाली. सरकारी अनुदानापोटी खर्च होणाऱ्या सव्वा दोन लाख कोटी रुपयांची प्रति वर्षी बचत झाली. फक्त गॅस सबसिडीपोटी देण्यात येणारे ५७ हजार कोटी रुपये दरवर्षी वाचतायत. त्यामुळे हे पैसे ज्यांच्या खिशात जात होते त्यांचा थयथयाट सुरू आहे.

भाजपामध्ये जाणाऱे या कारवाईतून कसे वाचतात? असा सवाल विरोधक करीत आहेत. संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनीही हा सवाल केला आहे. भ्रष्टाचाराची देशात खोलवर पारंब्या रुतलेले भ्रष्टाचाराचे वटवृक्ष उखडणे हा अजेंडा मोदी सरकार राबवते आहे. एकदा हे डेरेदार वृक्ष नष्ट केले की, मग लव्हाळी संपवायला किती वेळ लागणार?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version