ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि महापौर नरेश म्हस्के विरोधी पक्षातील नगरसेवकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. याच आरोपाच्या अनुषंगाने सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन एक निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत आहे. राज्यातील काही रेड झोन मधील जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्हा समाविष्ट आहे. गेली वर्षभर ठाण्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असतानाही महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याची तक्रार वारंवार समोर येत होती. यावरूनच महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी आयुक्त बिपीन शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
हे ही वाचा:
चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली
ठाकरे सरकार मद्याच्या धुंदीत, कारभार हलेडुले
यावेळी कोविड १९ लसीकरणाच्या मुद्द्यावरून आयुक्तांसमोर तक्रारी मांडण्यातआल्या आहेत. महासभेत जेव्हा सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात नगरसेवक आपले मत मांडू इच्छितात तेव्हा त्यांना बोलायला वेळ दिला जात नाही अन्यथा त्यांचा माईक बंद केला जातो. अशी तक्रार विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून केली जात आहे यासंबंधी आयुक्तांना भेटून भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, राष्ट्रवादीचे शानु पठाण आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी निवेदन दिले आहे. त्यांच्यासोबतच तिन्ही पक्षांचे काही प्रमुख नगरसेवक उपस्थित होते.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही शिवसेनेसोबत सत्तेत असतानाही स्थानिक पातळीला मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडताना दिसत आहे. त्याची झलक नुकतीच ठाण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेच्या विरोधात उमटणारा हा सुर सत्ताधारी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.