महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या झालेल्या पीछेहाटीचे कारण स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या भाजपाच्या बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर आपली मते मांडली.
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं नरेटिव्ह तयार करण्यात आलं. पण ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाचा सफाया झालेला आहे. जर त्यांच्या पक्षाला या भागात जागाच मिळाल्या नाहीत तर त्यांना सहानुभूती होती हा मुद्दाच राहात नाही.
फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या जागा कुणाच्या भरवशावर त्यांना मिळाल्या. त्यांना मराठी माणसाचं पाठबळ नव्हतं. वरळीत फक्त सहा हजार मते जास्त मिळाली. शिवडीत ३० ते ४५ हजारांचा लीड घ्यायला हवा होता, विक्रोळी भांडूपमध्ये ६० हजारांचा लीड हवा होता पण त्यांना मिळाला अवघा ८ हजारांचा लीड. एका विशिष्ट समाजामुळे त्यांनी मतांची आघाडी घेतली.
उद्योग महाराष्ट्राबाहेर पळवले असे खोटे नरेटिव्ह तयार केले गेले. २०२३, २०२४ मध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र खालच्या क्रमांकावर होता.
फडणवीसांनी सांगितले की, आपली लढाई तीन पक्षांविरोधात नव्हती तर चौथा पक्षही कार्यरत होता. तो म्हणजे खोट्या नरेटिव्हचा. त्याकडे आपण नीट लक्ष दिलं नाही. संविधान बदलणार हे एक नरेटिव्ह त्यांनी तयार केले. पण आपण ते नरेटिव्ह बदलू शकलो नाही. ते नरेटिव्ह खालपर्यंत झिरपले. भाजपा संविधान बदलणार की काय, असे लोकांच्या गळी उतरविण्यात ते यशस्वी ठऱले. दलित, आदिवासी समाजात हे नरेटिव्ह त्यांनी पसरवले. अर्थात, असा नरेटिव्ह एका निवडणुकीत चालतो, प्रत्येक निवडणुकीत चालत नाही.