पवारांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांचे टीकास्त्र

पवारांच्या पत्रकार परिषदेवर विरोधकांचे टीकास्त्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या पत्रानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. राज्यातून गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार नेमकी काय भूमिका घेणार ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पवारांकडून काहीतरी ठोस पाऊले उचलली जाण्याची अपेक्षा राज्याच्या जनतेला होती. पण पवारांनी एवढ्या गंभीर आरोपांनंतर सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख ह्यांची पाठराखणच केली. या प्रकरणात काहीच धड ना बोलता पवारांनी फक्त टोलवाटोलवीच केली.

शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी पवरांवर टीकास्त्र डागले आहे. अनिल देशमुखांच्या बचावात सरसावलेल्या शरद पवारांची विरोधकांनी पिसे काढली आहेत. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली या वेळी फडणवीसांनी पवारांचा चांगलाच समाचार घेतला.

हे ही वाचा:

पवार साहेब विंडो ड्रेसिंग नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरून शरद पवारांची टोलवाटोलवी

परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

“शरद पवार यांची पत्रकार परिषद पाहून आश्चर्य वाटले. परंतु सरकारचे निर्माते ते असल्याने सरकारची सरकारचं रक्षण करणं हे त्यांचं काम आहे. आम्हाला पवार साहेबांचे विंडो ड्रेसिंग नकोय, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवाय” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर ताशेरे ओढले आहेत. “बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे पवारांचे वैशिष्ट्य. पत्रकार परिषदही तशीच होती.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील शरद पवारांवर तोफ डागली आहे. “पवार साहेबांचं स्टेटमेंट बघितल्यावर खात्री होऊ लागते की १०० कोटी फक्त एका मंत्र्यासाठी नसून एका टोळीसाठी होते. पार्सल एक वाटेकरी अनेक.” असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनीही ट्विटरच्या माध्यमातू शरद पवारांना लक्ष्य केले आहे. शरद पवार म्हणतात परमबीर सिंह ह्यांच्या पत्राखाली सही नव्हती. मग शरद पवार अनिल देशमुखांचे ट्विट आणि स्टेटमेन्ट सही केलेले आहे असे म्हणत स्विकारणार का? असा सवाल सोमैय्यांनी केला आहे.

Exit mobile version