राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली आहे.
बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना धारेवर धरले. आपला पक्ष जर महाराष्ट्रात नंबर वन क्रमांकावर आणायचा असेल तर नुसती भाषणे करून काहीही होणार नाही. पक्षासाठी कष्ट उपसायला हवेत, मेहनत घ्यायला हवी, असे ते म्हणाले. ते म्हणतानाच त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा असेही सांगून टाकले. आपल्याला पक्षाची एखादी जबाबदारी सोपविण्यात आली तर आपण काहीतरी करून दाखवू असे आश्वासनही त्यांनी दिले.
अजित पवारांच्या या पवित्र्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. त्यात आता अजित पवारांच्या निमित्ताने काय वेगळे घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
अजित पवार म्हणाले की, मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झालं”, असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा:
मी ग्रेट आहे कारण मी हिंदू आहे, हे ठासून सांगा!
मोदींसोबत जगाने केला योगाभ्यास
चीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!
योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!
ते पुढे म्हणाले की, मला त्यातून मोकळे करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन”, असं अजित पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या विविध नेत्यांकडे सोपविल्या. त्यात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपविण्यात आले. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडेही पदे सोपविण्यात आली पण अजित पवारांकडे मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. त्यावेळी अजित पवारांची देहबोली चर्चेचा विषय बनली होती. मात्र आपण यामुळे नाराज नाही, निराश नाही असे ते म्हणाले होते. यावेळी मात्र त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्या आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना ते म्हणाले की, नवे कार्यकर्ते पुढे येत आहेत. त्यामुळे आहेत त्याठिकाणी काही बदल करा. भाकरी फिरवायची झाली तर ती फिरलीच पाहिजे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळेही चर्चेला खतपाणी मिळाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून त्यांनी याबाबत आपण काहीही अंदाज व्यक्त करू शकत नाही, असे स्पष्ट केले.