पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गाळात रुतलेला असतानाच इम्रान खान सरकारपुढे घरगुता आव्हानांना तोंड देण्याचे संकट उद्भवले आहे. इम्रान खान सरकार विरोधात पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकवटले आहेत आणि पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे (पीडीएम) नेते मौलाना फझलूर रहमान यांनी सांगितले आहे की मतभेद असले तरीही पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकत्र आहेत.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकरच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याची कल्पना मांडली होती, मात्र पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाने ही कल्पना फेटाळून लावली. या पार्श्वभूमीवर पीडीएमच्या नेत्याने हे विधान केले होते.
पेशावर येथे माध्यमांशी बोलताना, पीडीएमचे नेते रहमान यांनी इम्रान खान सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “पीडीएम एकत्रितपणे उभी आहे आणि आम्ही योग्य वेळ आली की दाखवून देऊच” असे त्यांनी सांगितले.
पीडीएम देशभर आणखी एक सरकारविरोधी रॅली काढणार असल्याची माहिती मिळाली आहे. इस्लामाबादमध्ये पीडीएमच्या उच्च स्तरिय सदस्यांच्या बैठकीनंतर पीडीएमचे प्रमुख मौलाना फझलुर रहमान यांनी रावळपिंडी येथील लियाकत बाग येथे ५ फेब्रुवारी रोजी पहिली रॅली आयोजित करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे आणि १३ फेब्रुवारी रोजी सियालकोट येथे रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
परदेशी गुंतवणुकीला सर्वात मोठा घोटाळा ठरवत, इम्रान खान हा या घोटाळ्यातील सर्वात मोठा गुन्हेगार असल्याचे रहमान यांनी म्हटले आहे.
पीडीएमने ऑक्टोबर महिन्यापासून पेशावर, गुजराणवाला, कराची, क्वेट्टा, मुलतान आणि लाहोर या शहरात विविध सरकारविरोधी रॅलींचे आयोजन केले आहे.
पीडीएमने इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.