ज्योती देवरे प्रकरणावरून विरोधकांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ज्योती देवरे प्रकरणावरून विरोधकांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये ज्योती देवरे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करायची इच्छा व्यक्त करत आहेत. यावरूनच राज्यातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तर महिलांसाठी कायमचा आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

हे ही वाचा:

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल

एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार ज्योतीताई देवरे यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप आणि एकूणच या साऱ्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून ‘मी सुद्धा तुझ्याकडे येते’ हा त्यांचा ऑडिओ मधील आवाज अंगावर शहारे आणणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून या महिला अधिकाऱ्याला बोलावून त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घेऊन तात्काळ तोडगा काढावा अशी विनंती फडणवीसांनी केली आहे.

ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकून मन सुन्न झालं असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. हे सारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, माँ जिजाऊंच्या महाराष्ट्रात घडत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी ज्यांच्या सोबत हे घडत आहे. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे. ‘महिला सशक्तिकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात कशी वेसण घालतात हेच आता बघायचे आहे.’ असे चित्र वाघ म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवालही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

Exit mobile version