केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!

भाजपाचे नेते परवेश वर्मा यांचे मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र

केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!

दिल्लीतील आगामी निवडणुकीच्या तोंडावर ‘शीश महल’ हा सध्या चर्चेचा विषय बनला असून भाजपाकडून अरविंद केजरीवाल आणि आपला यावरून सातत्याने लक्ष्य केलं जाता आहे. अशातच दिल्ली भाजपाचे नेते परवेश वर्मा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करण्याची विनंती केली आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री असताना सरकारी बंगला खास सुशोभित करण्यात आला होता आणि त्याला भव्य स्वरूप देण्यात आले होते त्यामुळे आता लोकांना ते घर पाहण्याची उत्सुकता असून तो त्यांनी खुला करून द्यावा.

भाजपाकडून परवेश वर्मा यांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले असून ते नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री अतिशी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, “माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकाळात सरकारी निवासस्थानाला विशेष सजावट करून भव्य स्वरूप देण्यात आले होते, हे निदर्शनास आणून द्यायचे आहे. सर्वसामान्यांमध्ये तो ‘शीश महल’ म्हणून ओळखला जात आहे. केजरीवाल यांना सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आणणाऱ्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील जनतेला ही वास्तू पाहण्याची तीव्र इच्छा आहे. ही इमारत आता केवळ निवासस्थान राहिलेली नाही, तर दिल्लीच्या शासन आणि प्रशासनाच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे प्रतीक बनली आहे. आपल्या निवडून आलेल्या प्रतिनिधीने आपला कार्यकाळ जिथे घालवला ती जागा कशी दिसते हे पाहून जनतेला समजून घ्यायचे आहे. त्यामुळे विनंती आहे की, हा ‘शीश महल’ सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सार्वजनिक दर्शनासाठी खुला करावा, जेणेकरून दिल्लीतील लोकांना जवळून पाहता येईल. यामुळे जनतेच्या अपेक्षा तर पूर्ण होतीलच शिवाय सरकार आणि जनता यांच्यातील पारदर्शकता आणि विश्वासही दृढ होईल.” असं म्हणत त्यांनी आपला खोचक टोला लगावला आहे.

हे ही वाचा..

बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

टाटा पंचने मारुतीला मागे टाकले

देशाच्या राजधानीला विकासाची गरज, ‘आप-दा’ची नाही!

हृदयद्रावक घटना : पाळीव प्राण्यांच्या दुकानात ५७९ प्राण्यांचा गुदमरून मृत्यू

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील अनेक भाजपा नेत्यांकडून ‘शीश महल’वरून आपवर निशाणा साधण्यात आला आहे. दिल्लीकरांच्या पैशांनी हा महल उभा करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात येत असून आगामी निवडणुकीत आपला या मुद्द्यावरून घेरण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version