गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात आली आहे. मुंबईत पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यादृष्टीने काल नागपुरमध्ये पार पडलेल्या विधीमंडळ समितीच्या बैठकीत सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी पूर्णतः कोरोना संपलेला नाही. त्यामुळे अधिवेशनात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक असणार आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.
हे ही वाचा:
म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा
कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी
तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, सुरक्षारक्षक, पोलीस या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचणी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जाईल. कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे. सभागृहामध्ये सुरक्षित अंतर राखता यावे यासाठी सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावर्षी प्रेक्षकांना कामकाज पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय मात्र संसदीय कामकाज समितीच्या बैठकीतच घेतला जाईल.