कलानी समर्थक २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या बातमीने मोठा गाजावाजा निर्माण केला होता. परंतु केवळ आठ नगरसेवकच राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्याचे आता भाजपने म्हटले आहे. राष्ट्रवादीमध्ये यादीतील दोन नगरसेवकांची नावे चुकीने आल्याचा खुलासा टीम ओमी कलानीने नुकताच केलेला आहे. तसेच मुख्य बाब म्हणजे, थेट नगरसेवक नसलेले स्वीकृत सदस्य आणि परिवहन समिती सभापतींचे नाव नगरसेवकांच्या यादीत घुसवण्यात आल्याचेही आता समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून, उल्हासनगरमधील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे. त्यामुळेच या घडामोडी लक्षात घेता, राज्याच्या गृहनिर्माणमंत्र्यांनी ठाण्यात एक जंगी कार्यक्रम केला. कार्यक्रमांतर्गत उल्हासनगरातील २२ कलानी समर्थक आणि कागदोपत्री भाजपच्या असलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, याबाबत आता एक नवीन खुलासा झालेला आहे. यातील काही नगरसेवक कायदेशीर अडचणींमुळे येऊ शकले नसल्याची सबब त्यांनी पुढे केलेली होती. त्यामुळे २२ हा दावा तद्दन खोटा असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादीने केलेल्या २२ नगरसेवकांच्या दाव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
मोबाईलवर संदेश आलाय, जरा जपून पावले उचला…
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार
कार्यक्रम झाला त्या दिवशीच सायंकाळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक प्रमोद टाळे यांनी त्यांचे नाव चुकून आल्याचे म्हटले आहे. टाळे यांनी एक चित्रफीत प्रसारित केली होती. याअंतर्गत माझे नाव त्या २२ नगरसेवकांच्या यादीत चुकून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लगेच काही वेळातच टीम ओमी कलानींचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक मंलग वाघे आणि पीआरपीचे प्रमोद टाळे यांची नावे चुकून समाविष्ट झाल्याचे कबूल केले. तसेच परिवहन समिती सभापती असलेले दिनेश लाहिरानी हे नगरसेवक नाहीत. मनोज लासी हे भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. अशी एकूण पाच नगरसेवकांची नावे नगरसेवकांच्या यादीतून बाद झाली आहेत. त्यामुळे कलानी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोळ्यात धूळफेक केल्याची चर्चा शहरात रंगू लागलेली आहे.