१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा

१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उज्ज्वला योजना २.० चे उद्घाटन केले आहे. या योजने अंतर्गत १ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या योजनेचे उद्घाटन केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १ कोटी महिलांना या योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील १ हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मादेखील उपस्थित होते. या योजनेत सरकारकडून केवळ कनेक्शनच नव्हे, तर मोफत सिलिंडरदेखील दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नसल्याचे देखील सांगितले गेले आहे. आपलं नाव आणि पत्ता एवढ्या तपशीलासह या गॅस योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेत पात्र ठरण्यासाठीचे निकष सरकारनं निश्चित केले आहेत.

या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.

या वेबसाईटवर अर्ज डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल. फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्यातील सर्व माहिती भरावी. हा फॉर्म एलपीजी गॅस केंद्रात जमा करावा. त्यासाठी आवश्यक कागदपत्रंही सोबत जमा करावीत. त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.

या कार्यक्रमावेळी पंतप्रधानांनी लाभार्थींशी संवाद देखील साधला. या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल पंतप्रधानांनी ट्वीट देखील केले आहे.

Exit mobile version