राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेच्या एका खासदाराने थेट राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांच्या दौऱ्यांविरोधात आवाज उचलला असून या प्रकरणात गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे राज्यातील सरकारमध्ये पुन्हा एकदा कलह होण्याची चिन्ह आहेत.
राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र सत्ता करता असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधली धुसपूस काही नवीन नाही. विविध कारणांवरून हे तिनही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. अशाच एका ताज्या प्रकरणात शिवसेना खासदाराने केलेल्या मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत.
हे ही वाचा:
शर्जील उस्मानी विरोधात दिल्लीतही गुन्हा
ठाकरे सरकार जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पाहणी दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सरकारमधील महत्वाचे मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे हे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या या दौऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग असे मिळून एकूण ६०-७० पेक्षा जास्त लोकांनी जमून गर्दी केली आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केले असा आरोप शिवसेना खासदारांनी केला आहे. म्हणूनच सादर प्रकरणात कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी व्हावी आणि गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना खासदार लोखंडे यांनी केली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून शिवसेना खासदारांना दौऱ्यात स्थान न मिळाल्यामुळे ते आरोप करत असल्याचे म्हटले जात आहे.