देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होण्याबाबत विधान केलं होतं. या विधानावर विविध प्रतिक्रिया येत असताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनीही विधान केलं आहे. त्यांनी याबाबत केलेलं हे विधान वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. पीओके भारतात सामील होण्याबाबत विधान करताना ते म्हणाले की, पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडेही अणुबॉम्ब असून ते आपल्याविरोधात त्याचा वापर करू शकतात, अशा आशयाचे विधान त्यांनी केलेलं आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत असताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, “जर संरक्षण मंत्र्यांना पीओके ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आम्ही त्यांना रोखणारे कोण आहोत? मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि दुर्दैवाने ते त्याचा आपल्या विरोधात वापर करू शकतात,” असे वादग्रस्त विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.
हे ही वाचा:
‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’
इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!
‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’
लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात होणाऱ्या विकासाचा दाखला देत म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोक स्वतःहून भारतात सामील होण्यासाठी पुढे येतील. पश्चिम बंगालच्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले होते की, “पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग होता आणि राहिल. मला वाटतं की पीओके ताब्यात घेण्यासाठी भारताला काहीही करावं लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे तेथे शांतता परत आली आहे, मला वाटतं की पीओकेच्या लोकांकडूनच भारतात विलीन होण्याच्या मागण्या पुढे येतील,” असं ते म्हणाले होते. तसेच पीओके घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही कारण लोक म्हणतील की आम्हाला भारतात विलीन केलं पाहिजे, असंही ते म्हणाले होते.