ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

तुम्ही जिंकलात की ईव्हीएम चांगले नाहीतर नाही

ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसची पुरती लाज काढली आहे. ईव्हीएमबाबत काँग्रेसकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना ओमर यांनी हास्यास्पद ठरविले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीतील पक्षांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. या मशिनच्या माध्यमातूनच महायुतीने ही निवडणूक जिंकली असे मत मविआच्या सर्व नेत्यांकडून व्यक्त होऊ लागले. त्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांनी खिल्ली उडविली आहे.

ओमर यांनी म्हटले आहे की, जेव्हा तुम्हाला याच ईव्हीएमवर लोकसभेत शंभर जागा मिळतात, तेव्हा तुम्ही पक्षाचा कसा विजय झाला याचे गुणगान गाता. पण काही महिन्यांनी जेव्हा निकाल बदलतात तेव्हा निकाल काही आपल्या बाजूने लागले नाहीत असे म्हणत त्याच ईव्हीएमला विरोध करता.

ओमर यांनी काँग्रेसला सवाल विचारला की, जर तुमचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही तर तुम्ही निवडणुका का लढता? जेव्हा तुमचा यंत्रणेवर विश्वास असतो तेव्हा तुम्ही त्याची तारीफ करता अन्यथा नाही. ओमर यांनी म्हटले की, माझे विचार हे मी कुणासोबत आहे त्यावर ठरत नाहीत तर ते तत्त्वांनुसार आहेत. त्याप्रमाणेच मी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवे संसदभवन उभारले जात आहे, ही उत्तम कल्पना आहे आणि अनेक वर्षे ती प्रलंबित होती, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!

मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात

हिजाब न घालता गाणे गायले, इराणकडून गायिकेला अटक!

अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला होणार उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

काँग्रेसने बॅलट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर करायला सुरुवात केली आहे. ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यावर ओमर म्हणतात की, ईव्हीएम मशिनना बळीचा बकरा का बनवले जाते ? त्याच ईव्हीएम मशिन लोकसभेला होत्या त्याच विधानसभेलाही आहेत.मतदार कधी तुम्हाला निवडतात तर कधी नाही. मीदेखील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो पण जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलो. मी ईव्हीएम मशिनवर खापर फोडले नाही.

सप्टेंबरमध्ये झालेल्य़ा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये मतभेद झाले होते. काँग्रेसने तेव्हा प्रचारात पूर्ण ताकद लावली नाही, असा नॅशनल क़ॉन्फरन्सचा आरोप होता. काँग्रेसला त्यात अवघ्या ६ जागा मिळाल्या तर नॅशनल कॉन्फरन्सने ४२ जागांवर विजय मिळविला होता.

Exit mobile version